एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांच्या घराबाहेर ‘या’ संघटनेचा राडा

135

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्याप सुरूच आहे. या आंदोलनाची तीव्रता देखील दिवसेंदिवस वाढत असून एसटी कर्मचारी आता आक्रमक होताना दिसत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्याचे हे आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत आता एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांसाठी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली आहे. आज जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर राडा घातला आणि परबांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्नही केला.

(हेही वाचा – मंत्री परबांच्या निवासस्थानी का वाढवला पोलिस बंदोबस्त? वाचा… )

कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवास स्थानाबाहेर जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं आणि शाई फेकण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर पोलिसांनी त्यांना अडवले असता कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून आपला निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी राडा घातल्यानंतर पोलिसांनी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

गनिमी काव्याने परबांच्या घराबाहेर कार्यकर्ते पोहोचले

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेतून अतुल खुपसे बाहेर पडले होते. त्यांनी जनशक्ती संघटना स्थापन केली होती. जनशक्ती संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत काही कार्यकर्त्ये आज गनिमी काव्याने अनिल परब यांच्या घराबाहेर पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या घराबाहेर आंदोलनं, निदर्शनं केली. परब यांच्या निवासस्थानावर शाई फेकण्याचाही प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आज सकाळी साडे अकरा वाजेदरम्यान जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी परबांच्या निवास्थानाबाहेर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात घोषणा केल्यात. कार्यकर्त्यांनी परबांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ डांबरासारखे दिसणारे काळं फेकले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ४ ते ५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.