Jaunpur : जौनपूरमध्ये मुंबईचा बाहुबली जिंकणार की जौनपूरचा? कृपाशंकर सिंह यांच्यासाठी निवडणूक का नाही सोपी?

जौनपूर (Jaunpur) लोकसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण पाहिल्यास क्षत्रिय, यादव, मुस्लिम, ब्राह्मण आणि दलित समाजाचे मतदार निर्णायक आहेत. क्षत्रिय आणि यादवांचे वर्चस्व राहिले आहे. या लोकसभा जागेवर यादव आणि ठाकूर तुल्यबळ आहेत.

223

एकेकाळी काँग्रेसमध्ये असताना हायकमांडच्या जवळ पोहचलेले कृपाशंकर सिंह यांनी २०२१ ला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. इथेही त्यांना अवघ्या तीन वर्षांत लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातून (Jaunpur) लोकसभा लढवण्याची संधी मिळाली आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशातील असला आणि उत्तर प्रदेशात भाजपाचा बोलबाला असला तरी कृपाशंकर सिंह यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही.

जौनपूर जन्मस्थळ इतकीच कृपाशंकर सिंह यांची ओळख 

कृपाशंकर सिंह यांचा जन्म जौनपूरमध्ये (Jaunpur) झाला, इतकाच काय तो त्यांचा या मतदार संघाशी संबंध आहे. बाकी त्यांचे सर्व जीवन मुंबईत गेले आहे. त्यांची कर्मभूमी मुंबईच राहिली आहे. कृपाशंकर सिंह यांचे जौनपूर येथे कधी जास्त वेळा येणे जाणे झाले नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी या मतदार संघातून थेट लोकसभेची तयारी करणे हे अग्निदिव्य आहे. कारण या ठिकाणी यंदाच्या वेळी जौनपूर येथे बाहुबली म्हणून ओळखले जाणारे धनंजय सिंह हे येथून लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे. याआधीही सिंह या ठिकाणाहून खासदार होते.

(हेही वाचा Sandeshkhali Violence : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावा; राष्ट्रीय महिला आयोगाची राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे शिफारस)

धनंजय सिंह तुरुंगात तरी पत्नीचे आव्हान असणार 

या भागात धनंजय सिंह यांची लोकप्रियता प्रचंड आहे. याआधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले धनंजय सिंह आता राजकारणात स्थिरावले आहेत. त्यांच्या मागे असलेला जनसमुदाय पाहिल्यास ते अपक्ष उभे राहिले तरी ते सहज निवडून येऊ शकतात, असे तेथील चित्र आहे. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर योगी सरकारने जौनपूर येथील नमामि गंगे प्रकल्प व्यवस्थापक अभिनव सिंघल यांचे अपहरण आणि खंडणी प्रकरणी धनंजय सिंह आणि त्यांचे सहकारी संतोष विक्रम सिंह यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणजे लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या धनंजय सिंह यांच्या राजकीय मनसुब्याला सुरुंग लागले. धनंजय सिंह यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आतापुरती धुळीला मिळाली असेल, पण तुरुंगात असताना ते त्यांची पत्नी श्रीकला रेड्डी किंवा त्यांच्या जवळच्या कोणत्याही नेत्याला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करू शकतात. श्रीकला रेड्डी या जौनपूरच्या जिल्हा पंचायत अध्यक्षा आहेत आणि त्या दक्षिण भारतातील प्रमुख राजकीय आणि व्यापारी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील जितेंद्र रेड्डी तेलंगणातून आमदार राहिले आहेत.

काय आहे जौनपूरचे राजकीय समीकरण? 

जौनपूर (Jaunpur) लोकसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण पाहिल्यास क्षत्रिय, यादव, मुस्लिम, ब्राह्मण आणि दलित समाजाचे मतदार निर्णायक आहेत. क्षत्रिय आणि यादवांचे वर्चस्व राहिले आहे. या लोकसभा जागेवर यादव आणि ठाकूर तुल्यबळ आहेत. 2019 मध्ये, श्याम सिंह यादव सपा-बसपा युती अंतर्गत विजयी झाले होते कारण दलित, मुस्लिम आणि यादव मतदार एकत्र होते. दुसरीकडे भाजप क्षत्रिय आणि ब्राह्मण मतांवर डोळा ठेवून आहे. अशा स्थितीत धनंजय यांच्या पत्नी श्रीकला किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी निवडणूक लढविल्यास क्षत्रिय मतांची चोरी होण्याचा धोका वाढेल, जो भाजपसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. श्रीकला यांनी सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली तर यादव-मुस्लीम आणि ठाकूर मतांचे समीकरण भाजपाचे उमेदवार कृपाशंकर सिंह यांच्यासाठी तणाव वाढवू शकतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.