देवेंद्र फडणवीसांना गृहीत धरू नका, सर्वांना पोहचवतील; जयंत पाटलांची कोपरखळी

बहुमत हातात होते. फक्त शपथ घेणे बाकी होते. मात्र ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांना एवढे सोपे समजू नका. ते गोड बोलतात, गोड हसतात. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना लाईटली घेऊ नये. या सर्वांना (भाजपाच्या नेत्यांना) ते कधी पोहोचवून येतील हे समजणारही नाही, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मारली. एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या प्रश्नाचे उत्तर या दोघांनाही माहिती नाही. पूर्वी तशी परिस्थिती नव्हती. अगोदर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जायचे. मात्र या सर्व लोकांनी फडणवीसांना यावेळी मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असे मिश्किल भाष्य जयंत पाटील यांनी केले.

२०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आले तर कोण मुख्यमंत्री होणार, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे जयंत पाटील यांनी थेट उत्तर दिले नाही. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, हे तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील. ते ठरवण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी बांधील नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here