‘तो’ सिनेमा नक्कीच निषेधार्ह! अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ चित्रपटाला पाटलांचा विरोध!

162

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे. त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

चित्रपटाचे प्रदर्शन इतक्या उशिरा का?

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यानंतर जो वाद निर्माण झाला, त्यावर जयंत पाटील यांनी पक्षाची रोखठोक भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली. नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा निघत असेल, तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे, असेही पाटील म्हणाले. हा सिनेमा मी पाहिला नाही किंवा त्यांची भूमिकाही. राष्ट्रवादीत येण्याअगोदरच ही भूमिका अमोल कोल्हे यांनी केली आहे. मात्र, त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होतेय हे माहित नाही, असेही पाटील म्हणाले.

( हेही वाचा: ‘राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते’, ओळखा पाहू कोण? भाजपचा जनतेला सवाल )

आमची भूमिका आव्हाडांनी स्पष्ट केली

या भूमिकेवर लोकांच्या प्रतिक्रिया व भावना व्यक्त होत आहेत, त्या चुकीच्या नाहीत. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी २०१७ साली ती भूमिका केली आहे. राष्ट्रवादीत ते त्यानंतर आले आणि लोकसभेची निवडणूक जिंकले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करुन ते घराघरात पोहचले. शिवाय लोकसभेत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भाषणेही केली आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. तो सिनेमा बघण्याची व वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. आमची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.