एमआयएमला महाविकास आघाडीमध्ये यायचे आहे, तशी खासदार इम्तियाज जलील यांनी मनोधारणा व्यक्त केली आहे. मात्र त्या आधी एमआयएमला सिद्ध करून दाखवावे लागेल. एमआयएम समविचारी आहे का? याचा अभ्यास करावा लागेल. त्यांचा पुरोगामी विचारसरणीवर आणि भाजपच्या आत्ताच्या वर्तनावर विरोध असेल, तर त्यांनी थेट दाखवला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.
एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आघाडीचा प्रस्ताव दिला. त्यामुळे राज्यात एकच राजकीय धुळवड सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचे निधन झाले म्हणून राजेश टोपे गेले असतील. अशावेळी राजकीय चर्चा करायची नसते. टोपे यांनी ती केली नसेल याची खात्री आहे. या चर्चेबाबत काही विधान करण्याची गरज नाही. निधन झालेले असताना जाणे आणि राजकीय चर्चा करणे ही आमची संस्कृती नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
(हेही वाचा आता ‘द गोवा फाईल्स’ बनवण्याची मागणी! कोणी आणि कसे केलेले हिंदूंवर अत्याचार? वाचा)
भाजपच्या पराभवात रस असेल तर स्पष्ट करावे
सपाचा पराभव झाला तिथे ८६ मतदारसंघात सपाच्या उमेदवारांना २ हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव झाला. काही ठिकाणी तर २०० ते ३०० मतांनी पण पराभव झाला. याच ठिकाणी एमआयएमच्या उमेदवारांनी २ ते ५ हजार मते मिळवली आहेत. यावरुन भाजपच्या विजयात एमआयएमचाच वाटा असल्याचे दिसून येते. पण या सगळ्यामध्ये त्यांना रस नाही हे त्यांनी सिद्ध करावे. भाजपच्या पराभवात त्यांना रस असेल तर त्यांनी हे स्पष्ट करावे. देशभरात त्यांच्या पक्षाने ही भूमिका घेतली तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढेल. उलट भाजपविरोधात समविचारी पक्ष एकत्र येण ही चांगलीच बाब आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community