जयश्री पाटलांकडे एसटी कामगारांचे ८० लाख रुपये?

248

एसटी कामगारांच्या संपाला हिंसक वळण आल्यानंतर पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर लगेच गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून त्या गायब आहेत. १३ एप्रिल रोजी गिरगाव न्यायालयात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जयश्री पाटील या फरार आहेत, त्यांच्याकडे एसटी कामगारांकडून जमा केलेल्या रकमेपैकी ८० लाख रुपये आहेत, असे सांगितले.

पवारांच्या घरावर हल्ला करण्यास जयश्री पाटलांनी सांगितले होते

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गिरगाव न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की, शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याआधी सदावर्ते यांच्या घरात बैठक झाली. सदावर्ते यांनी १ लाख एसटी कामगारांकडून प्रत्येकी ५३० रुपये वसूल केले. अशा प्रकारे ही रकम १ कोटींपेक्षा अधिक होती, ही रकम ३ कोटींपर्यंत असू शकते, अशी शक्यता वकील घरत यांनी व्यक्त केली. यासंबंधीचा तपशील सदावर्ते यांच्या डायरीत आहे, असेही ते म्हणाले. पवारांच्या घरावरील हल्ला करण्यास जयश्री पाटील यांनीच सांगितले होते, अशी धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघड झाली आहे. त्याआधारेच कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे.

(हेही वाचा गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी)

हल्ल्यासाठीच्या कोअर कमिटीत जयश्री पाटील

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आधीच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्यानंतर आता त्यांची पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यासुद्धा अडचणीत आल्या आहेत. पोलिसांनी आता त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांच्या घरावर जे आंदोलन झाले ते जयश्री पाटील यांच्या सांगण्यावरून झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ७ एप्रिल रात्री ११ ते ८ एप्रिल पहाटे २ वाजून ५० मिनिटे या कालावधीत गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील , जयश्री पाटील आणि कोअर कमिटीतील इतर लोकांची सदावर्ते राहत असलेल्या क्रीस्टील टॉवरच्या टेरेसवर मीटिंग झाली. याच मीटिंगमध्ये जयश्री पाटील यांनी पवारांच्या घरावर आंदोलन करण्यास सांगितले, असे पोलीस तपासात आढळून आले आहे.

एसटीच्या कामगारांनी केले होते हिंसक आंदोलन

आठ एप्रिल रोजी आंदोलन झाले त्यावेळी नागपूरची व्यक्ती मुंबईत होती. सर्व गोष्टी तोच हॅन्डल करत होता. त्या व्यक्तीनेच महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर उतरून गटागटाने सिल्व्हर ओक जवळील मैदानात जमा व्हा, असे मेसेज दिले. गार्डनमध्ये जमल्यावर अभिषेक पाटील यांनी कळविताच नागपूरच्या व्यक्तीने पत्रकारांना पाठविण्यास सांगितले, अशी धक्कादायक बाबही पोलीस तपासातून समोर आली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर ८ एप्रिल रोजी एसटी कामगारांनी अचानक धडक दिली होती. हिंसक जमावाने गेटमधून आत घुसत दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठ्या धाडसाने जमावाला सामोरे जात त्यांची समजूत काढली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता. या प्रकरणी पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. एसटी कामगारांची बाजू कोर्टात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातून या प्रकरणाला वेगळंच वळण लागताना दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.