झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी जाणार, निवडणूक आयोगाची राज्यपालांकडे शिफारस

175

झारखंडमध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होणार असल्याचे सांगण्यात येत असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. अवैध खनिज उत्खनन प्रकरणात सोरेन यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सोरेन यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तसा अहवाल राज्यपालांना सादर केला आहे.

पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करत स्वतःच्या भावाच्या कंपन्यांना खाणी लीजवर दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. खनिज मंत्रालयाची जबाबदारीही सोरेन यांनी आपल्याकडे ठेवली होती. त्यामुळेच याबाबत ईडीने कारवाई करत सोरेन यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापेमारी केली होती. यामध्ये हेमंत सोरेन हे दोषी असल्याचे आढळून आले आहेत.

निवडणूक आयोगाची राज्यपालांना शिफारस

हेमंत सोरेन यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या असून सोरेन यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आयोगाने या संदर्भातील अहवाल झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता राज्यपालांकडून हेमंत सोरेन यांचे सदस्यत्व रद्द करण्याची घोषणा करण्यात येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार देखील कोसळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.