जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हा षडयंत्र – अजित पवारांचा आरोप

103

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसे जसे वेळ जाईल, तसे यामागील सूत्रधार कोण आहे हे समोर येईल. हे षडयंत्र आहे, कुणी त्या भगिनीला ही तक्रार दाखल करायला लावली हे समोर येईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

सरकारसाठी लाजिरवाणी बाब!  

ज्या प्रकरणात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती क्लिप पाहिल्यावर कुठेही विनयभंग झाल्याचे दिसत नाही. एकतर जिथे मुख्यमंत्री गाडीत बसले आहेत, त्याच्या १० फुटांच्या अंतरावर जितेंद्र आव्हाड गर्दीतून वाट काढत जात असतील, तर यात काय गैर? ही लाजिरवाणी बाब आहे. सरकार येतात आणि जातात, तुम्ही कायमस्वरूपी सत्तेवर नसता, प्रमुख पदावर १४५ आमदारांचा पाठिंबा असेपर्यंत ती व्यक्त त्या पदावर राहू शकते. वास्तविक मुख्यमंत्री यांनी स्वतःहून सांगितले पाहिजे की, मी स्वतः त्या ठिकाणी होतो, तिथे असे  काहीही घडले नाही. काहीच दिवसांपूर्वी मुंब्रा भागात छट पुजेचे आयोजन केले होते, तिथे आव्हाड होते, त्या वेळी ज्या महिलेने आव्हाडांच्या विरोधात तक्रार केली आहे, ती महिला त्या कार्यक्रमात हसत असल्याचाही व्हिडीओ आहे, असेही पवार म्हणाले.

(हेही वाचा हात-पाय मोडेपर्यंत मारले तरी पुन्हा ‘आफताब’सोबत गेली आणि…, शरीराचे 35 तुकडे झालेल्या मुलीच्या हत्येची सत्यकथा)

गृहखात्याचा गैरवापर 

विरोधी पक्षनेता म्हणून मी तातडीने आव्हाडांना भेटलो आहे. याआधी विवाना मॉलमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण झाली, त्या प्रकरणात मारहाण झालेली व्यक्ती आव्हाडांमुळे मी वाचलो असे म्हणाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात जातीने लक्ष द्यावे, कायदे आपण कुणावर अन्याय होऊ नये यासाठी करतो त्यातून कुणा निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणार नाही हे पाहायला पाहिजे, पोलीस दबावाखाली काम करत आहेत. आम्ही १५ वर्षे सरकारमध्ये होतो, त्यावेळी जयंत पाटील, छगन भुजबळ, आर आर पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद होते, त्यावेळी आम्ही असे राजकारण केले नव्हते. या खात्याचा गैरवापर केला नाही. आव्हाडांच्या प्रकरणात विनयभंग झाला नसताना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. अंबादास दानवे आणि आम्ही आव्हाडांच्या पाठीशी आहोत. अन्यायाचा मुकाबला करायचा असेल तर मतदारांच्या विश्वासाला तडा न देता संघर्ष करूया. संविधान टिकले पाहिजे. कुठे तरी नियमांचा आधार घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जात असेल तर हे लोकशाहीला अतिशय घातक आहे. प्रत्येकाने तारतम्य बाळगून वागले पाहिजे. पोलिसांनी दबावाला घाबरण्याचे कारण नाही. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा. अधिवेशनात वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून आम्ही याला वाचा फोडू, असेही अजित पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.