Jitendra Awhad यांच्याकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान

181
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

काही लोक असतात, ज्यांना पाहुन असं वाटतं की ते चुकीच्या व्यवसायात आले आहेत. त्यांनी त्यांना साजेसा व्यवसाय केला असता तर विद्यमान व्यवसायाची बदनामी झाली नसती. त्यापैकी एक म्हणजे जितेंद्र आव्हाड. आव्हाड हे शरद पवारांचे विश्वासू आहेत आणि अनेक वर्षांपासून ते राजकीय नेते म्हणून वावरण्याचा अभिनय करत आहेत. मात्र त्यांचं बोलणं, वागणं हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या राजकीय नेत्याला शोभणारं नाही. टिव्ही डिबेटमध्ये ते गुंडगिरीची भाषा वापरतात. बऱ्याचदा ते गांधींचा वारसा सांगतात मात्र त्याविरुद्ध वागतात, संविधानाचं नाव घेतात आणि संवैधानिक मूल्ये मोडतात. मग थिएटरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाला केलेली मारहाण असो किंवा अनंत करमुसे यांचे अपरहण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न असो, या सर्व प्रकरणांत जितेंद्र आव्हाड असतात आणि इतके गुन्हे करुन पुन्हा ते संविधान बचाव म्हणून बोलत फिरतात. अशा नेत्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण दूषित झालं आहे.

काही महिन्यांपूर्वी संजय राऊत भलतेच फॉर्ममध्ये होते. जणू ते महाराष्ट्राचे मुघल बादशहा झाल्याच्या अविर्भावात वावरत होते. भुवया उडवत, पत्रकार परिषदेत गलिच्छ शिव्या देत फिरत होते. या लोकांनी एक गलिच्छ संस्कृती निर्माण केली आहे. श्रीमंती आणि राजकीय शक्तीच्या बळावर सर्वसामान्य माणसाला आपण त्रास देऊ शकतो, कुणाचाही अपमान करु शकतो, आपल्या मनाप्रमाणे कायदा वाकवू शकतो, अशी खात्री त्यांना असते. खरंतर संविधानाचं रक्षण करायचं असेल तर गुंडगिरी करणाऱ्या राजकीय गुंडांना तुरुंगात धाडायला हवं.

(हेही वाचा Indi Alliance नंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट; काय म्हणाले नेते?)

स्टंट करण्यात आणि पराकोटीचा अतिरिक्त अभिनय करण्यात कुशल असलेले जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बाबासाहेबांचं नाव घेत असतानाच त्यांच्या मनात महामानवाबद्दल किती द्वेष आहे हे समोर आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले. म्हणून आव्हाडांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात आणि पुण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता सुरु असताना विनापरवाना आंदोलन केल्याचाही आरोप त्यांच्याविरुद्ध करण्यात आला आहे.

आपल्यावर टीका होत आहे आणि लोक आपल्याविरोधात बोलू लागले आहेत, हे कळल्यावर आव्हाडांनी माफी मागत पुन्हा एक स्टंट केला. मात्र बाबासाहेबांचा अपमान त्यांनी मुद्दाम केल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. एक कार्यकर्ता त्यांना फोटो फाडण्यापासून अडवत होता. तरी देखील त्यांनी फोटो फाडला. आता आव्हाड यांनी माफी मागितली म्हणून त्यांना माफ करावं का? आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो आता फाडला असेल, पण बाबासाहेबांचे विचार ते आपल्या कृतीतून वेळोवेळी फाडत आलेले आहेत. गुंडगिरी करणे, सामान्य माणसाला जीव जाईपर्यंत मारणे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्काराच्या विरुद्ध कृत्य आहे. त्यामुळे ते कधीही आंबेडकरांच्या मार्गावरुन चाललेले नाहीत. उलट आंबेडकरांचे नाव राजकारणासाठी वापरुन दडपशाही प्रस्थापित करण्याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. सामान्य लोकांना मारहाण करुन, अतिरेक्यांची बाजू मांडून त्यांनी वेळोवेळी संविधानाचा आणि महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. आज त्यांनी हा अपमान थेट कृतीतून केला इतकेच. जर इतर कोणत्याही माणसाकडून असा प्रकार घडला असता तर त्यांनी गुंडगिरी करत त्याला मारहाण केली असती आणि त्याचं आयुष्य उध्वस्त केलं असतं. म्हणून आव्हाडांना माफी न देता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, हाच बाबासाहेबांचा सन्मान असेल.
जय भीम…जय हिंद…

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.