सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरु आहे. पक्षात नाराजीचा सूर दिसत आहे. ही नाराजी आता थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी दिसून येत आहे. कालपर्यंत पक्षात अशी नाराजी अजित पवार यांनी उघडपणे व्यक्त केली होती. आता जितेंद्र आव्हाड यांच्यात नाराजी आहे का, असा प्रश्न नागपूरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरमुळे समोर आला आहे.
बॅनर आला चर्चेत
नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे नागपूरच्या रस्त्यांच्या बाजूने विविध पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताचे बॅनर झळकू लागले आहेत. असाच एक बॅनर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या स्वागताचा बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण या बॅनरवर सर्वात आधी अजित पवार यांचा फोटो आहे, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शेवटी छगन भुजबळ यांचा फोटो आहे. मात्र यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटोच नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बॅनर असो, अथवा पक्षाचे बॅनर असो गल्लीपासून दिल्लीपर्यंत राष्ट्रवादीच्या कोणत्याही बॅनरवर आधी शरद पवार यांचा फोटो ठसठशीत दिसतो, अशा वेळी शरद पवारांचे अगदी विश्वासू समजले जाणारे जितेंद्र आव्हाड यांच्या बॅनरवर मात्र शरद पवार यांचा फोटो नाही, त्यामुळे नागपुरात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नावाचाही उल्लेख नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजांच्या यादीत जितेंद्र आव्हाडांची भर पडली आहे का, अशीही चर्चा रंगली आहे. याआधी अजित पवार यांनी अनेकदा उघडपणे नाराजी प्रकट केली आहे. त्यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र जमले होते, त्यामध्ये आमदार रोहित पवार मात्र गैरहजर होते, त्यामुळे रोहित पवार हेही नाराज आहेत का, अशी चर्चा सुरु झाली होती.
(हेही वाचा विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, भीक, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे! विधानसभेत खडाजंगी)
Join Our WhatsApp Community