गिरीश कुबेरांच्या पुस्तकात संभाजी महाराजांचा अपमान! खासदार संभाजी राजेंनी केली कारवाईची मागणी

सरकारने या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही संभाजी राजे यांनी केली आहे.

127

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याबद्दल पत्रकार गिरीश कुबेर यांनी आपल्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ पुस्तकात आक्षेपार्ह उल्लेख केला आहे. याबाबत भाजप खासदार संभाजी राजे यांनी गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध केला आहे. त्याचप्रमाणे सरकारने यावर योग्य ती कारवाी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

काय म्हणाले संभाजी राजे?

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयरबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले. त्याबद्दल सर्वप्रथम आपण पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप खासदार संभाजी छत्रपती यांनी दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान सर्वश्रुत आहे. पण काहीतरी विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी किंवा खोडसाळपणा करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी, अशाप्रकारचे संदर्भहीन लिखाण बरेच लोक करत असतात. यापैकीच एक हे असावेत, अशी खोचक टीकाही संभाजी राजे यांनी गिरीश कुबेर यांच्यावर केली आहे.

कारवाईची केली मागणी

‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर महाराष्ट्र आणि देशभरात कायमची बंदी घालण्यात यावी. तसेच बाजारत विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाने आपल्या ताब्यात घ्यावीत. हा अतिशय गंभीर विषय आहे. त्यामुळे सरकारने या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही संभाजी राजे यांनी केली आहे.

काँग्रेसनेही केला निषेध

महाराष्ट्राचे दैवत छ. संभाजी महाराजांबद्दल पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात बदनामी कारक मजकूर आहे. या पुस्तकात संभाजीराजे आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण असल्याने मराठी अस्मितेला ठेच पोहचवण्याचे काम करण्यात आले आहे. राज्य सरकारने या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी तसेच गिरीश कुबेर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

सरकारनेही दखल घ्यावी

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम आजही काही कथा, कांदबऱ्या तसेच पुस्तकातून केले जात आहे. आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भात असाच बदनामी करण्याचा प्रकार केला आहे. यामुळे तमाम मराठी जनतेच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, याची सरकारने नोंद घ्यावी आणि कुबेरांच्या ‘रेनिसान्स स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.