Nitin Gadkari : पत्रकारितेचे व्रत घेऊन महाराष्ट्रातील पत्रकार काम करतात; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मराठी पत्रकार परिषदेचा गौरव

163

‘पत्रकारिता हे एक वृत्त आहे. पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे पत्रकार लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहेत. पण आज पत्रकारांना सत्य लिहिण्याची किंमत मोजावी लागते. कारण सत्य हे अनेकांना प्रिय नसते. मात्र त्यानंतरही महाराष्ट्रात पत्रकारितेचे व्रत घेऊन पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत, याचा खूप आनंद होतो. पत्रकारांतीचे एक गुणात्मक परिवर्तन आजही महाराष्ट्रात पाहण्यास मिळते. महाराष्ट्रातील पत्रकार ज्या पद्धतीने काम करतात, ते इतरत्र पाहण्यास मिळत नाही,’ असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त करतानाच मराठी पत्रकार परिषदेच्या कामाचे कौतुक केले.
८५ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. २०२२ च्या पुरस्कारांचे वितरण आज, शुक्रवार (२३ जून) रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषेदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे होते. तर, याप्रसंगी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर , सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेच्या डिझिटल शाखेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, सह राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई शाखेचे अध्यक्ष राजा आदाटे, कार्याध्यक्ष संजय मिस्किन, उपाध्यक्ष विनायक सानप, सरचिटणीस दीपक पवार, कोषाध्यक्ष पांडुरंग म्हस्के, सहसचिव विशाल परदेशी यांच्यासह आदी पदाधिकारी, राज्यभरातून आलेले पत्रकार उपस्थित होते.

‘आपला देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे,’ असे सांगतानाच गडकरी पुढे म्हणाले, ‘लोकशाहीचा मीडिया हा एक स्तंभ आहे. लोकशाहीचे ज्ञान सामान्य माणसापर्यंत नेण्याचे काम हे पत्रकार करीत असतात. चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकारांनी करावे. समाजासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे जीवन चरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनी काम करण्याची गरज आहे. कारण भविष्यकाळ हा ज्ञानाशी संबंधित असतो, व कोणतेही ज्ञान हे संवादाशी संबंधित असते. एखाद्या व्यक्तीचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार जेव्हा करतात, तेव्हा ते हजार लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करत असतात. एखाद्या व्यक्तीचे यश हे हजार लोकांपर्यंत नेण्याचं काम पत्रकार करू शकतात, हे आपण वेळोवेळी पाहिले आहे. त्यामुळेच पत्रकारितेचे व्रत स्वीकारून एक व्रतस्थ पत्रकार म्हणून प्रत्येक पत्रकारांनी काम करावे,’असेही ते म्हणाले.

मराठी पत्रकार परिषदेचे गडकरींकडून कौतुक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कौतुक केले. गडकरी म्हणाले, ‘खरंतर पत्रकारांना नाव मिळत असते, पण त्या प्रमाणात पैसा मिळत नाही. पत्रकारितेत आजकाल स्थिरता मिळताना दिसत नाही. आजकाल तर चांगले काम करणाऱ्या माणसाचा कोणी सन्मान ही करत नाही. पण आजही पत्रकारितेत गुणात्मक काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करण्याचे काम मराठी पत्रकार परिषद करत आहे. त्यामुळे मी मराठी पत्रकार परिषदेचे खूप खूप अभिनंदन करतो. खरतर जेथे 100 टक्के लोक विद्वान असतात, अशा संघटना फार काळ टिकत नाही. पण मराठी पत्रकार परिषद ही १९३९ मध्ये सुरू झालेली संघटना आजही टिकून आहे, हे लोकशाही दृष्टीने महत्त्वाचे आहे. मराठी पत्रकार परिषदेचा प्रवास असाच सुरू राहील, अशा शुभेच्छा देतो ‘ असेही गडकरी म्हणाले.

मुंबई गोवा चे काम लवकरच पूर्ण होईल

दरम्यान, यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी कोकणातील पत्रकार सातत्याने आंदोलन करीत आहे. गेल्या बारा वर्षांपासून हा रस्ता रखडलेला आहे.तो लवकरात लवकर पूर्ण करावा,’ अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यावर मंत्री गडकरी यांनी सांगितले की, ‘मुंबई- गोवा या महामार्गाचे काम येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. खरं तर दिल्ली-मुंबई हा १३०० किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाला. पण अद्याप मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. कारण या महामार्गाचे काम पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या. आता त्या अडचणी जवळपास पूर्णपणे सोडवण्यात आल्या असून डिसेंबर अखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल.’

याप्रसंगी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, ‘एखाद्याला पुरस्कार मिळणे फार कठीण गोष्ट असते. त्यासाठी खूप चांगलं काम करावे लागते. त्यामुळेच ज्यांना आज पुरस्कार देण्यात आले आहे, त्या सर्व पत्रकारांची मी अभिनंदन करतो. संघटनेसाठी वाहून घेतलेली एस. एम. देशमुख यांच्यासारखी माणसेच संघटना उभी करू शकता. हे आज या संघटनेच्या ताकतीवरून दिसून येत आहे. माझे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांची खूप मोठी भूमिका आहे. सत्तेचे बाजू मांडायचे काम पत्रकार नेहमीच करत असतात,’ असेही ते म्हणाले.

(हेही वाचा Western Railway : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कांदिवली पूर्वमधील पादचारी पुलावरील सरकते जिने बदलणार)

परिषेदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रमध्ये पेन्शन योजना पत्रकारांसाठी सुरू झाली, पण गेल्या सहा वर्षात फक्त 130 लोकांना पेन्शन मिळाली. या पेन्शन योजनेतील जाचक अटी दूर करून जास्तीत जास्त पत्रकारांना पेन्शन द्यावी, यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही सरकारने प्रयत्न करावेत. पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा महाराष्ट्रात असला तरी त्याची चांगली अंमलबजावणी व्हावी, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. पत्रकारांना रेल्वेच्या प्रवासाची जी पूर्वीची सुविधा होती, ती केंद्र सरकारने पुन्हा सुरू करावी. तसेच मुंबई- गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकार सातत्याने आंदोलन करीत असून तो प्रश्न सरकारने मार्गी लावावा. बीड ते नांदेड या रस्त्याची चौपदरीकरण करावे, जेणेकरून बीड हे मोठ्या शहराशी जोडले जाईल,’ अशा विविध मागण्या देशमुख यांनी गडकरी यांच्याकडे करतानाच मराठी पत्रकार परिषदेच्या कामाची माहिती दिली.

पुरस्कार प्राप्त पत्रकरांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘ग्रामीण भागातून आलेल्या माझ्यासारख्या पत्रकारांचा आज सन्मान करण्यात आला. कोणतीही संघटना चालवणे सोपे काम नसते, त्यातही पत्रकारांची संघटना चालवणे खूप अवघड आहे. मात्र मराठी पत्रकार परिषदेने हे काम करून दाखवले व एक मोठी संघटना उभी राहिली, हे खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळे आज मला पुरस्कारच्या रूपामध्ये जो काही 25 हजाराचा चेक मिळाला आहे, तो मी संघटनेला मदत म्हणून देत आहे,’ असेही त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी करताना मराठी पत्रकार परिषदेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा सांगितला. स्वागत मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखेचे अध्यक्ष राजा आदाटे यांनी केले. तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी पाटील यांनी केले, व आभार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी मांडले.

‘या’ पत्रकारांचा झाला सन्मान

मराठी पत्रकार परिषेदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात यावर्षी ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना दिला गेला. २५ हजार रुपये रोख मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर, आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना, शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार न्यूज १८ लोकमतचे मिलिंद भागवत यांना, प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार सकाळचे मारूती कुंदले यांना, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार मॅक्स महाराष्ट्रच्या प्रियदर्शनी हिंगे यांना, भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार धुळयाचे बापू ठाकूर यांना, नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर यांना, रावसाहेब गोगटे स्मृती पुरस्कार संगमेश्वरचे जेष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार अलिबागचे पत्रकार मोहन जाधव यांना दिला गेला. शिवाय संतोष पवार स्मृती उत्कृष्ट प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार धुळ्याचे पत्रकार गोपी लांडगे यांना दिला गेला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.