अधिवेशनात सिनिअरपुढे ज्युनिअर आमदारांना ‘बोलता’ येईना!

सभागृहात लांबलचक भाषणबाजी करत सभागृहाचा आणि सदस्यांचा वेळ खात असल्याचा आरोपच काही आमदारांनी दबक्या आवाजात केला आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले असून, १० दिवसांच्या या अधिवेशनात गोंधळाशिवाय काहीच निष्पन्न झाले नसल्याची प्रतिक्रिया काही आमदारांनी खासगीत बोलताना व्यक्त केली. ज्या अधिवेशनाकडे सर्वसामान्यांचे लक्ष असते त्याच अधिवेशनात जर बोलायची, प्रश्न मांडायची संधी मिळत नसेल तर अधिवेशन तरी काय कामाचे, असा संतप्त सवाल सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील काही नवनिर्वाचित आमदारांनी हिंदुस्थान पोस्टशी खासगीत बोलताना सांगितले. एवढेच नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशन फक्त १० दिवसांचे आहे, हे माहिती असून देखील काही सीनिअर मंडळी सभागृहात लांबलचक भाषणबाजी करत सभागृहाचा आणि सदस्यांचा वेळ खात असल्याचा आरोपच काही आमदारांनी दबक्या आवाजात केला आहे.

भाषणबाजीत सुधीर भाऊ सर्वात आघाडीवर

भाजपकडून सभागृहात बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचा नंबर लागतो. आपल्या आक्रमक शैलीत आणि कवितांचे दाखले देत सुधीरभाऊ सत्ताधाऱ्यांवर तुटून पडल्याचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहायला मिळाले. त्यांचे हेच रुप दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात देखील पहायला मिळाले होते. मात्र ज्या पद्धतीने सुधीर भाऊ सभागृहात भलेमोठे भाषण करतात, यावर विरोधी बाकावरील आमदारांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहाने बोलण्याची वेळ मर्यादा ठरवून द्यायला हवी, त्यामुळे इतर आमदारांना देखील सभागृहात प्रश्न मांडण्याची संधी मिळू शकते. असे मत अनेक नवनिर्वाचित आमदारांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः भारताचा खरा इतिहास लिहिला म्हणून हिंदुत्वनिष्ठ फ्रांसुआ गोतिए यांचे ट्विटर अकाउंट बंद! )

मतदारसंघातील जनतेला तोंड कसे दाखवायचे?

सर्वच पक्षांतील नवनिर्वाचित आमदारांना याबाबत विचारले असता त्यांनी आम्ही आमच्या मतदारसंघातील प्रश्न मांडता यावेत यासाठी अधिवेशनाला उपस्थित राहतो. पण बऱ्याचदा असे होते की, वरिष्ठांच्या सभागृहातील लांबलचक भाषणबाजीमुळे सभागृहात बोलण्याची संधीच मिळत नाही. बऱ्याचदा मतदारसंघात देखील जनतेकडून प्रश्न उपस्थित केले जातात की, तुम्ही सभागृहात आमचे प्रश्न मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे इथे जर सभागृहात बोलण्याची संधी मिळत नसेल तर मतदारसंघातील जनतेला नेमकं सांगायचं तरी काय, असे काही आमदारांनी खासगीत बोलताना सांगितले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच निवडून आलेल्या एका आमदाराने तर पुढच्या वेळी जर बोलू दिले नाही तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असे आपल्या पक्षातील वरिष्ठांना सांगितल्याचे खासगीत बोलताना सांगितले.

महिला आमदारही नाराज

सभागृहात बोलू दिले जात नसल्याची तक्रार महिला आमदारांची देखील आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना महिलांना प्राधान्य द्यायला हवे, असे काही महिला आमदारांनी सांगितले. याआधी देखील अनेक महिला आमदारांनी सभागृहात बोलू दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली होती.

(हेही वाचाः सुओ मोटो म्हणजे नेमकं काय?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here