Karnataka Assembly Election : काँग्रेसचा विजय प्रादेशिक पक्षांसाठी डोकेदुखी  

काँग्रेसला भाजप पेक्षा साधारण 7 % टक्के मते जास्त मिळाली आहेत. पण भाजपचा 2018 चा व्होट शेअर अजिबात घटलेला नाही.

201

कर्नाटकात अभूतपूर्व विजयानंतर भाजपला जसा धडा शिकायला मिळाला, त्यापेक्षा गंभीर इशारा कर्नाटकच्या जनतेने प्रादेशिक पक्षांना दिला आहे. राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेचा करिष्मा मतदानाच्या टक्केवारीतून काँग्रेसला लाभ देऊन गेल्याचे काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आवर्जून नमूद केले आहे. पण काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल अर्थात जेडीएस यांच्या मतांच्या टक्केवारीचा नीट अभ्यास केला, तर कर्नाटकात काँग्रेस भाजपच्या मतांच्या टक्केवारीला धक्का लावू शकलेली नाही. पण स्वतःची टक्केवारी वाढवण्यासाठी काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाची मते खाल्ली आहेत आणि हाच नेमका काँग्रेसचा प्रादेशिक पक्षांना मते फोडण्याच्या धोक्याचा इशारा आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले आघाडीचे नेते सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्नाटकात काँग्रेसचा विजय ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीतल्या विजयाची छोटी पायरी असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी त्यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील आणि राहुल गांधी पंतप्रधान बनतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. पण विरोधकांच्या ज्या एकजुटीचा विश्वास सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे, त्याला छेद देणारी आकडेवारी कर्नाटकाच्या निवडणुकीत सिद्ध झाली आहे.

(हेही वाचा Karnataka Assembly Election : काँग्रेसच्या राजवटीत आता हिजाब, पीएफआयला प्रोत्साहन बजरंग दलावर मात्र निर्बंध)

काँग्रेसला कर्नाटकात 42.93% मते मिळाली. भाजपला 36.17% मते मिळाली, तर जेडीएसला 12.97% मते मिळाली. जेडीएसला 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 17 % पेक्षा जास्त मते मिळाली होती. ती यावेळी साधारण 5 % च्या आसपास घसरली आहे आणि तिथेच काँग्रेसचा लाभ झाला आहे. काँग्रेसला भाजप पेक्षा साधारण 7 % टक्के मते जास्त मिळाली आहेत. पण भाजपचा 2018 चा व्होट शेअर अजिबात घटलेला नाही. भाजपला अपेक्षित असलेली मतांची टक्केवारी वाढली नाही, हा खऱ्या अर्थाने भाजपचा पराभव आहे. भाजपने राबविलेल्या यंत्रणेचा पराभव आहे. यापेक्षा वेगळे काही तिथे घडलेले नाही.

पण काँग्रेसने जी 7 % मते भाजप पेक्षा जास्त मिळवली आहेत, त्या जास्त मिळवलेल्या मतांमधूनच काँग्रेसने भाजप पेक्षा सुमारे दुप्पट जागा मिळवण्याच्या पराक्रम केला आहे. काँग्रेसला तिथे 137 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. भाजप 63 जागांवर अडकून पडली आहे, तर जेडीएसला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ काँग्रेसने भाजपचा पराभव करताना स्वतःची मतांची टक्केवारी वाढवत दुसऱ्या धर्मनिरपेक्ष प्रादेशिक पक्षाची मतेच कापली आहेत आणि हीच प्रादेशिक पक्षांसाठी डोकेदुखी बनणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.