Karnataka Assembly election : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदरी निराशा

बेळगाव जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पराभवाच्या छायेत असून त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.

213

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास घोषित झाला असून यामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. मात्र महाराष्ट्राचे या निवडणुकीत सीमा भागातील निकालाकडे लक्ष होते. कारण सीमावर्ती भागात मुख्यमंत्री बोम्मई यांनी मराठी आणि महाराष्ट्राच्या विरोधात केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच, यंदाच्या कर्नाटक निवडणुकीत सीमा भागांत मराठी उमेदवार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची चर्चा होती. बेळगाव भागातील मराठी बांधवांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने यंदा जिल्ह्यात ५ उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी पाहायला मिळाली, जिल्ह्यातील १८ मतदारसंघापैकी १३ मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. तर उर्वरीत मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. या १८ पैकी ५ मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर प्रचारसभाही घेतली होती. तर, आमदार रोहित पवार यांनीही एका मतदारसंघात समितीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र, प्रस्थापितांना शर्थीने लढा देणाऱ्या या पाचही उमेदवारांचा पराभव निश्चित मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी २ वाजेपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर पाटील यांना ९५९३ मतं मिळाली आहेत. तर, येथील भाजपचे विठ्ठल हलगेकर ९०,७३६ मतांनी पहिल्या क्रमांकावर आघाडी घेऊन आहेत. बेळगाव दक्षिण मतदारसंघात रमाकांत कोंडूसकर आणि भाजप उमेदवारांत जोरदार लढत होती. मात्र, भाजपचे अभय पाटील विजयी झाले आहेत, त्यांना ७७,०९४ मतांसह आघाडीवर असून कोंडुसकर यांना ६४,७८६ मतं मिळाली आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघातील समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांना ६३८९ मतं असून येथे भाजप उमेदवार डॉ. रवि पाटील मतांसह ४२४११ मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, काँग्रेसचे असिफ सेट हे ४६,७३० मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेचे लक्ष्मी हेब्बाळकर १,०४,२२२ मतांसह प्रथम आघाडीवर आहेत. येथील समितीचे उमेदवार आर.एम. चौघुले यांना ४२,२३१ मत मिळाली आहेत. आहेत. यमकनमर्डी मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मारुती नाईक यांना दुपारी १ वाजेपर्यंत १९६० मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सतिश झारकीहोली यांचा विजय निश्चित मानला जात असून त्यांनी दुपारी २ वाजेपर्यंतच्या झालेल्या फेऱ्यांत ९७,८६३ मतं घेतली आहेत. दरम्यान, यावरुन, बेळगाव जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पराभवाच्या छायेत असून त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.

(हेही वाचा Karnataka Election Results 2023 : मोदी – शाह यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली – शरद पवार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.