कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर दावा केला आहे. त्यांनी ट्वीट करुन मराठी भाषिक आणि महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करावेत अशी मागणी करुन कर्नाटकची एक इंच भूमी कोणाला देण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे म्हटले. तसेच, कर्नाटक आपल्या भूमीचे, पाण्याचे आणि सीमांचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे, असेही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सांगलीतल्या जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले होते. त्यावर उत्तर देताना महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही, पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह गाव मिळवण्याचा प्रयत्न करु, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले होते. यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करुन महाराष्ट्राला डिवचण्याला प्रयत्न केला.
काय म्हटलंय ट्वीटमध्ये?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले. परंतु त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कर्नाटकची भूमी, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये भूमी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट यासारखे कन्नड भाषिक भाग कर्नाटकात सामील व्हावेत, अशी आमची मागणी आहे, असे ट्वीट बसवराज बोम्मई यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community