- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
कर्नाटकामध्ये कॉंग्रेस विजयी झाली असून मला तरी त्यात फारसे नवल वाटत नाही. एकतर कर्नाटकात एकदा सत्ता उपभोगल्यानंतर परत दुसर्या टर्मला सत्ता मिळत नाही, अशी परंपरा आहे. दुसरी गोष्ट भाजपामधील अंतर्गत कलह आणि मोदी जादूची कांडी फिरवून आपल्याला जिंकून देतील, अशी मनःस्थिती या कारणामुळे कर्नाटकाची सत्ता हातातून जाणारच होती. एक्झिट पोलवर प्रश्न विचारला असताना बोम्मई यांची पराभूत बॉडी लॅंग्वेज पराभवाची ग्वाही देत होती.
आता काँग्रेस जिंकली आणि भाजपाचा पराभव झाला हे सत्य आहे आणि हे सत्य भाजपाच्या समर्थकांना पचत नाही. अर्थात हा विजय तर कॉंग्रेसने पूर्णपणे लोकशाही मार्गाने मिळवला आहे. मात्र महाविकास आघाडीची स्थापना लबाडी करु झाली होती. तेव्हाही भाजपाचे समर्थक चिडले होते. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सत्ता येते आणि जाते, मात्र मानसिकता विजयाची असायला हवी. कर्नाटकच्या विजयानंतर भाजपाच्या समर्थकांची मानसिकता पराभवाची झाली आहे का, अशी शंका येऊ लागली आहे.
तरी समर्थकांनी चिंता करण्याचे मुळीच कारण नाही. २०२४ ची लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची आहे. त्या दृष्टीने ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. कमल हसन हे उत्कृष्ट अभिनेते असून डाव्या विचारांचे आहेत. त्यामुळे ते भाजपाचे विरोधक आणि कॉंग्रेसचे समर्थक आहेत. कर्नाटक विजयाचे श्रेय त्यांनी राहुल गांधींना दिले आहे. त्यांनी राहुल गांधी यांची तुलना महात्मा गांधी यांच्याशी केलेली आहे. महात्माजींप्रमाणे राहुल गांधींनी लोकांची मने जिंकली आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा Maharashtra Political Crises : आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाचे उपाध्यक्षांना साकडे )
खरे पाहता कर्नाटक विजयात स्थानिक कॉंग्रेस नेत्यांचे कौतुक व्हायला पाहिजे. सध्या काँग्रेसची अवस्था फारच बिकट आहे, अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात बलशाली असलेल्या भाजपाच्या विरोधात या स्थानिक नेत्यांनी लढा दिला आणि विजय प्राप्त केला. परंतु कॉंग्रेसमध्ये गांधी परिवाराशिवाय पत्ता हलत नाही असे म्हणतात. आता या बातमीने भाजपा समर्थकांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. कारण २०२४ च्या निवडणुकीला एक वर्ष इतका कमी कालावधी राहिला असून राहुल गांधींना पुन्हा फॉर्ममध्ये आणलं जात आहे.
डावे पत्रकार आणि विचारवंतांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मूर्खपणाकडे झुकलेली ’निर्भय बनो’ ही चळवळ सुद्धा जोर धरु लागली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा राहुल गांधींवर स्तुती सुमने उधळण्यास सुरुवात झाली आहे. या पराभवामुळे २०२४ ला मोदी हरणार असं नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे आणि हेच भाजपासाठी लाभदायक ठरणार आहे. राहुल गांधी विरुद्ध मोदी असा सामना कधीच रंगू शकत नाही. राहुल गांधींचा चेहरा बघितल्यावर लोक मोदींना मतदान करतात. मोदींनी घडवून आणलेली सुधारणा, केलेली सामाजिक आणि राजकीय क्रांती व विकास या बळावर मोदी निवडून येतीलंच परंतु राहुल गांधी प्रतिस्पर्धी म्हणून उभे असतील तर कॉंग्रेसला मिळणारी काही मते देखील मोदींना मिळतील. गंमतीचा भाग सोडला तरी राहुल हे नापास झालेले विद्यार्थी आहेत आणि त्यांना त्याच कॉलेजचा मुख्याध्यापक व्हायचे आहे. जे शक्य नाही. त्यामुळे कर्नाटकात झालेला पराभव म्हणजे २०२४ च्या विजयाकडे वाटचाल आहे. कमल हसन यांनी भाजपला ठसन देण्यासाथी राहुल गांधींची स्तुती केली असली तरी यामुळे कॉंग्रेस फसणार आहे.
Join Our WhatsApp Community