एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, उलट बेळगाव महाराष्ट्रात घेणार! फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

113

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा वादाच्या भोव-यात सापडला आहे. यावरुन अनेकदा राजकीय वातावरण देखील तापल्याचे पहायला मिळाले असताना, आता कर्नाटक सरकारने एका नवीन कुरापतीला सुरुवात केली आहे. कर्नाटकच्या सीमेला लागून असणा-या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर देखील कर्नाटक सरकारने आपला दावा सांगितला आहे.

त्यामुळे आता सीमावाद आता आणखी भडकण्याची चिन्ह असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

(हेही वाचाः सर्वोच्च न्यायालयाचेही Online RTI Portal सुरू होणार, न्यायालयातील ‘ही’ माहिती घरबसल्या मिळणार)

एकही गाव जाणार नाही

2012 साली जत तालुक्यातील 40 गावांनी ठराव करुन आपल्याला कर्नाटकात सामील व्हायचे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता नव्याने कोणताही ठराव करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही. इतकंच नाही तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाबाबत लढाई लढून बेळगाव,कारवार,निप्पाणीसहित सर्व गावे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी योजना

2012 मध्ये पाणीप्रश्नावरुन जत तालुक्यातील या गावांनी ठराव केला होता. मी मुख्यमंत्री असताना कर्नाटक सरकारशी वाटाघाटी करुन या गावांना पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच म्हौसाळ योजना राबवून या गावांना तत्काळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य करण्यात येत आहे. त्यामुळे सीमा भागातील आपल्या गावांसाठी आपण अजून काही योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान तथ्यहीन असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

कर्नाटक सरकारचा दावा

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक सरकार दावा सांगण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे, तिथे पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला असल्याचे बोम्मई यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः महाराष्ट्र – कर्नाटक प्रश्न अधिक तापणार; कर्नाटकची नवी कुरापत, ‘या’ तालुक्यावर केला दावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.