आषाढी एकादशीची पंढरपूर येथील विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री करत असतात, मात्र कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षी कार्तिकी एकादशीच्या महापूजेला मराठा आरक्षणाच्या वादाची किनार जोडली गेली आहे. राज्याला दोन दोन उपमुख्यमंत्री असताना यंदाची कार्तिकी पूजा कोण करणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. मंदिर समितीच्या बैठकीत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला बोलावू नये अशी भूमिका घेतली.
मराठा आरक्षणासाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला पूजा करू देणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतल्याने यंदा कार्तिकीची महापूजा कोण करणार हा पेच कायम राहिला आहे. मंदिर समितीची बैठक सकाळी सुरू झाल्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने किरणराज घाडगे, संदीप मांडवे, रामभाऊ गायकवाड, नितीन शेळके यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मंदिर समितीच्या बैठकीत जाऊन सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांना कोणत्याही उपमुख्यमंत्री अथवा मंत्र्याला तुम्ही निमंत्रण देऊ नका असा इशारा दिला. यावेळी संतप्त आंदोलकांनी आधी आरक्षण मग पूजा अशी घोषणाबाजी करत कोणत्याही मंत्री, आमदार अथवा खासदाराला आरक्षण देण्यापूर्वी पंढरपूरमध्ये पाऊल ठेऊ देणार नाही अशी घोषणाबाजी केल्याने मंदिर समिती बैठकीत काही काळासाठी तणाव निर्माण झाला.
मंदिर समिती बैठकीत गोंधळ
कार्तिकी पूजेसाठी (Kartiki Ekadashi) उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्यास यात्रा कालावधीत होणाऱ्या प्रकाराला शासन आणि मंदिर समिती जबाबदार राहील असा इशारा मराठा आंदोलकांनी मंदिर समितीला दिला. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनामुळे 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीच्या पूजेला बंदी करून येऊ दिले नव्हते. तशीच वेळ पुन्हा येईल असा इशारा रामभाऊ गायकवाड यांनी दिला.
Join Our WhatsApp Community