कसबा पोट निवडणुकीचा प्रचार शुक्रवार, २५ फेब्रुवारी रोजी थंडावला असला तरी शनिवारी हा प्रचार सुरूच असल्याचे दिसले. कारण होते दोन्ही बाजूंकडील आरोप प्रत्यारोप. मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून पैशाचे वाटप केल्याचा आरोप करत दगडूशेट गणपती मंदिराबाहेर उपोषण आंदोलन सुरु केले, तर खोटे आरोप करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना सुबुद्धी मिळावी, म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडूशेट मंदिरात आरती केली. विशेष म्हणजे या ठिकाणी रविवार, २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून प्रचार बंद झाल्यावर कसबा पेठेतील रविवार पेठ गंज पेठ आणि बहुतांश भागात पैशाचे वाटप केले. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप करत त्यांनी थेट दगडूशेट गणपती मंदिराच्या बाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून लागलीच भाजपचे कार्यकर्ते दगडूशेट गणपती मंदिरात दाखल झाले. त्यांनी गणपतीची आरती सुरु केली. भाजपवर खोटे आरोप करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. पराभव दिसू लागल्यामुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर खोटे आरोप करणे सुरु केले आहे. पुराव्यानिशी आरोप सिद्ध करावेत, असे आवाहन भाजपने केले आहे.
Join Our WhatsApp Community