राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी नवरेह महोत्सवानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काश्मिरी हिंदू समुदायाला संबोधित केले. जम्मूतील संजीवनी शारदा केंद्रातर्फे एक ते तीन एप्रिल दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मोहन भागवत यांनी काश्मिरी हिंदू समुदायाला संबोधित केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी काश्मिरी पंडित लवकरच खोऱ्यात परततील, असे म्हटले आहे. 1990 च्या दशकात दहशतवाद सुरू झाल्यानंतर घरातून विस्थापित झालेले काश्मिरी पंडित लवकरच खोऱ्यात म्हणजेच आपल्या घरी परततील, अशी आशा भागवत यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले मोहन भागवत?
भागवत म्हणाले, “मला वाटते, की तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित आपल्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ने काश्मीरी पंडितांचे खरे चित्र आणि 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून झालेल्या त्यांच्या पलायनाचा खुलासा केला आहे.” पुढे ते असेही म्हणाले की, आज प्रत्येक भारतीयाला काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे सत्य माहित आहे. आता काश्मिरी पंडितांना अशा प्रकारे त्यांच्या घरी जायचे आहे, की तेथून पुन्हा कधीही पलायनाची वेळ येणार नाही आणि यासाठी हीच खरी वेळ आहे. काश्मिरी पंडितांनी आपल्या घरी परतण्याचा संकल्प करायला हवा. जेणेकरून परिस्थिती लवकर बदलेले.
चित्रपटाबद्दल भागवत म्हणाले…
काश्मीर फाइल्स या चित्रपटाचा संदर्भ देत मोहन भागवत म्हणाले की, हळूहळू सत्य देशासमोर येत आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य लोक काश्मिरी हिंदूंच्या वेदना समजून घेत आहेत आणि त्यांना काश्मिरी हिंदूंबद्दल सहानुभूती आहे. आता काश्मीरमध्ये अशा वस्त्या होतील की पुन्हा कोणीही विस्थापित होऊ शकणार नाही. संयमाने प्रयत्न चालू ठेवा. संपूर्ण भारताचा अविभाज्य भाग बनणे म्हणजे काश्मीरमध्ये स्थायिक होणे आणि राहणे होय. असा विश्वासही त्यांनी काश्मीरी पंडीतांना दिला.
(हेही वाचा – भारतीय हवाई दलाकडून चेतक हेलिकॉप्टरच्या सेवांचा सन्मान)
काही लोक चित्रपटाच्या समर्थनार्थ आहेत, तर काही लोक याला अर्धसत्य म्हणत आहेत. मात्र, या चित्रपटाने कटू सत्य जगासमोर आणून लोकांच्या मनाला हादरा दिला आहे, असे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे. एवढेच नाही, तर कुणीही काश्मिरी पंडितांना जाण्यासाठी मजबूर करू शकत नाही. जर कुणी असे करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याला परिणाम भोगावे लागतील, असेही भागवत म्हणाले.