राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अपमानास्पद भाषेतील पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी सध्या अभिनेत्री केतकी चितळे ही पोलिसांच्या ताब्यात आहे. अशातच आता तिच्यावर जातीवाचक वाक्यप्रयोग केल्याबद्दल तिच्यावर रबाळे पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर गोरेगाव पोलिसांनीही केतकीच्या कोठडीची मागणी केली असून ते तिचा ताबा घेणार आहेत. मात्र त्याआधीच आता रबाळे पोलिसांनी केतकीचा ताबा घेतला आहे.
नवबौद्ध यांचा अवमान करणारी पोस्ट लिहिली
न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र केतकीचा ताबा देण्यात आला नव्हता. आता रबाळे पोलिसांनीच केतकीचा ताबा घेतला आहे. केतकीने १ मार्च 2020 रोजी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने अनेक धर्मांचा उल्लेख केला आहे. केतकीने तिच्या पोस्टमधून नवबौद्ध यांचा अवमान करणारी पोस्ट लिहिली होती. त्यामुळे नवबौद्धांसंदर्भातल्या वाक्यावर आक्षेप घेत स्वप्निल गोविंद जगताप यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरुनच आता केतकीला ताब्यात घेण्यात आले आहे. ब्राह्मण द्वेष किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत की, मुसलमान, ख्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू, असेही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय, असेही केतकीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मला कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तिंचा द्वेष नक्कीच आहे, अशी शेवटची ओळही केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिली होती.
(हेही वाचा केतकी चितळे प्रकरणी तृप्ती देसाईंच्या नजरेत, सुप्रिया सुळे नापास आणि पंकजा मुंडे पास)
Join Our WhatsApp Community