केतकी चितळेचा राज ठाकरेंनीही केला निषेध! म्हणाले, ही मानसिक विकृती!

107

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत..! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट लिहिल्यावर त्यावर पत्राद्वारे मतप्रदर्शन केले.

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी लोकासारखे लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली, आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असे नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे, त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा ‘रसना गर्ल’ ; जन्म, मृत्यू, वय आणि १४चा आकडा)

राज्य सरकारने याचा छडा लावावा   

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा. पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते. समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजल असेलच, हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्य सरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.