मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर नावे ठेवणाऱ्या उबाठाच्या राज्यात जनता वाऱ्यावर अन् लाडका मुलगा योजना जोरात होती, अशी घणाघाती टीका शिवसेना सचिव, प्रवक्ते माजी आमदार किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांनी केली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहून उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाऊ बहिणीच्या नात्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमचा एक भाऊ तुमच्याच विरोधात कोर्टात गेला. तुम्हाला बहीण भावाचे नाते काय कळणार, असा सवाल पावसकरांनी यावेळी उपस्थित केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मुद्रांक शुल्कात सूट, एसटीमध्ये महिलांना तिकिटात सरसकट ५० टक्के सवलत यासह जननी सुरक्षा योजना, महिलांच्या बचत गटांसाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत.
याउलट मविआच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणत्याही लोकाभिमुख योजना राबवल्या नाहीत. जनतेच्या कामांऐवजी त्यांनी कंगना राणावत यांच्यावर कारवाई केली. खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना केवळ हनुमान चालीसा म्हटले म्हणून तुरुंगात टाकले. सोशल मिडिया पोस्टवरुन केतकी चितळे हिला तब्बल ४० दिवस तुरुंगात डांबले होते. उबाठाने मुख्यमंत्री असताना मुलाला वाचवण्यासाठी दिशा सालियन योजना राबवली अशी खरमरीत टीका पावसकर (Kiran Pawaskar) यांनी केली. पावसकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान, गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अशा घटनात्मक पदावरील व्यक्तींबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, दाऊदला साथ उद्धव ठाकरेंनी दिली. संजय राऊत यांचे दाऊतसोबत संबध आहेत, असा दावा पावसकर यांनी यावेळी केला.
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : तिरंदाजीत मिश्र सांघिक प्रकारात धीरज, अंकिताचं कांस्य थोडक्यात हुकलं)
उद्धव ठाकरे यांनी ‘याचे’ भान ठेवावे – पावसकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत घाम फुटला, या उद्धव ठाकरेंच्या टीकेची पावसकर यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की एकेकाळी उबाठाचे १८ खासदार होते ते ९ पर्यंत कमी झाले. मोदींना घाम फोडला, असे म्हणता पण खरतर लोकसभा निवडणुकीत तुम्हालाचा घाम फुटला, अशी टीका पावसकर (Kiran Pawaskar) यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान कसले देता? फडणवीसांकडे १२० आमदार आहेत तुमच्याकडे १५ आमदारही शिल्लक राहिले नाहीत, याचे उद्धव ठाकरे यांनी भान ठेवावे, असे पावसकर म्हणाले. आरक्षणाबाबत पावसकर म्हणाले की, शरद पवार यांनी २०१० साली स्पष्ट केले होते की, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही. यासंदर्भातली बातमी तेव्हा वर्तमान पत्रातही छापून आल्याचे पावसकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोग महाराष्ट्रात आला. ओबीसींची यादी तयार होत असताना, २७२ जातींची यादी तयार केली. त्यावेळी पवारांनी त्यात मराठा समाजाचा समावेश केला नाही. याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच होती. इंद्रा साहनी निकाल १६ नोव्हेंबर १९९२ रोजी जाहीर झाला. त्या निकालात कुठेही राज्यांनी मंडल आयोग लागू करावा, असं सांगितलेलं नव्हतं. मंडल आयोग तेव्हा संसदेने व कोर्टाने ही मान्य केलेला नव्हता. परंतु महाराष्ट्रात १९९४ मध्ये मंडल आयोग लागू करण्याच्या नावाखाली याच शरद पवारांच्या सहीने ओबीसींच्या आरक्षणात तब्बल १८% वाढ करण्यात आली. खुल्या प्रवर्गातले १८% कमी करण्यात आले आणि इंद्रा सहानीने सांगितलेली ५०% आरक्षणाची मर्यादा तशाप्रकारे लॉक करण्यात आली आणि संपवण्यात आली. अशाप्रकारे मराठा समाजाचा जो घटनात्मक अधिकार होता तो शरद पवार यांनी तेव्हा डावलला, याकडे पावसकर (Kiran Pawaskar) यांनी लक्ष वेधले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community