केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिले, त्यावर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हिसकावण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले, त्या आरोपावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत उलट सवाल केला आहे. त्यांनी ‘मला आशा आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोर्टात याचिका करणार आहे, त्यात हा आरोप, माहितीचा उल्लेख करणार का, असा सवाल उपस्थित केला.
या ट्वीटसोबत किरीट सोमय्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, संजय राऊत म्हणतात शिवसेना नाव आणि निशाणासाठी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाला. उद्धव ठाकरे आपण आणि संजय राऊत जे न्यायालयात अपील करणार आहेत, त्यात हा आरोप आपण करणार ना? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
संजय राऊत यांचे आरोप?
ज्या पद्धतीने शिवसेना आणि शिवसेनेचे चिन्ह आमच्याकडून हिसकावून घेण्यात आले तो न्याय नाही, सत्य नाही, असे मी ट्विट करून देशाला कळवले आहे. हा व्यवहाराचा व्यवसाय झाला आहे. तो विकत घेतला गेला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 2 हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हिसकावण्यासाठी 2000 कोटी रुपये खर्च झाले, ही माझी प्राथमिक माहिती आहे. हा निवाडा विकत घेतला आहे.
ऑनलाईन याचिका दाखल करणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आजच सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community