नाव बहिणींचे, मालमत्ता अजित पवारांची! किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

साखर कारखाना स्वत: घेतला तोही बेनामी. त्यामुळे त्यांना पदावर राहता येणार नाही, अशा शब्दात सोमय्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बेनामी मालमत्ता असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.  तसे दाखले सोमय्यांनी थेट पत्रकार परिषदेत दिल्याने पवारांच्या अडचणीत आता वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक नक्की कोण? 

गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांच्या घरांवर आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. हे धाडसत्र आजवरच्या काळातील सर्वात जास्त काळातील धाडसत्र असावे, असे आपल्याला वाटते.  पहिल्या दिवशी अजित पवार भावूक होऊन म्हणाले की, फक्त रक्ताचे नातं म्हणून बहिणींच्या घरावर धाडी टाकल्या. आपला थेट प्रश्न शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, पार्थ पवार आणि सुप्रिया सुळेंना आहे की, जरंडेश्वर साखर कारखान्याचा जो मालक आहे, मुख्य भागधारक आहे, त्यात एक नाव आहे मोहन पाटील, जे विजया पाटील यांचे पती आहेत. दुसरे आहेत निता पाटील. हे लोक कोण आहेत? त्यांच्याशी अजित पवारांचे काय नाते आहे? हे पवारांनी स्पष्ट करावे, असेही सोमय्या म्हणाले.

(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरः पहिले आणि सर्वात मोठे सैन्यकूटनीतीक व सामरिक तज्ज्ञ)

अजित पवारांनी राजीनामा द्यावा!

जरंडेश्वर साखर कारखाना जेव्हा विकत घेतला, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. यात राज्य सरकारचे पैसे आहेत. अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारचा पैसा जातो. अजित पवारांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली, लिलाव केला आणि स्वत:च स्वत:च्या कंपनीसाठी विकत घेतला. सगळ्या नियमांचे उल्लंघन केले. जरंडेश्वर साखर कारखाना स्वत: घेतला तोही बेनामी. त्यामुळे त्यांना पदावर राहता येणार नाही, अशा शब्दात सोमय्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here