मी अनेक फाईलींचे अगदी सचिन वाझेच्या फाईलींची पहाणी केली आहे. तिथे सर्व ठिकाणी मला खुर्ची दिली होती. त्या सर्वांना नोटीस देणार का? कुणाला खुर्ची द्यायची आणि कुणाला नाही, हा तर इंग्रजांच्या काळातील कायदा होता. तुम्ही तो कायदा आणणार का? आता मंत्रालयात जायचे, तर लोकांनी स्वत:ची खुर्ची घेवून जायची का?, असा खोचक सवाल भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला.
भाजप नेते किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी नगरविकास खात्याच्या विभागाला भेट दिली होती. यावेळी एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून ते फायली चाळत होते. याबद्दलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये नगरविकास विभागाचे अधिकारी हे उभे असल्याचे दिसत आहे. संबंधित फोटो व्हायरल झाल्यानंतर सोमय्या यांना दोन दिवसांत या प्रकरणात खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली. याच नोटीसीवरुन किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?
- माझी उद्धव ठाकरे यांना विचारणा आहे की, माझ्यावर गुन्हा कधी दाखल करणार? माझा दोष काय, म्हणे तर मी सरकारी खुर्चीत कसा बसलो. तुमचे खोटे पकडले, म्हणून तुम्ही कर्मचाऱ्सांना लिपिकाला नोटीस बजावता? हिम्मत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. नाहीतर त्या लिपिक परिवाराची माफी मागा. ज्यांनी फोटो घेतले त्यांना नोटीस बजवायची की जे पीडित आहेत त्यांना नोटीस बजावायची? ही नोटीस कोणत्या कायद्या अंतर्गत बजावली? ही तर दादागिरी आहे, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी रोष व्यक्त केला.
- तुम्ही राजकीय भ्रष्टाचार करता. लढाई या किरीट सोमय्याशी करा. हिंमत असेल तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी लढाई करा. त्या लिपिकाला तुम्ही नोटीस देता. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री माफी मागा. लिपिक परिवाराची माफी मागा. त्या फोटोत असे काय आहे? त्या फोटोसाठी तुम्ही किरीट सोमय्यांना नोटीस पाठवली की, दोन दिवसात एक्सप्लनेशन द्या. वा रे ठाकरे सरकार, असा घणाघात सोमय्यांनी केला.
- मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही. ठाकरे सरकारने महाराष्ट्राला लुटायचे आणि ते उघडकीस आणले की असे वागायचे. मी पोलीस ठाण्यासह सर्व विभागातील सचिवांना तक्रार दिली आहे. इतकेच नाही तर ज्यांनी मला नोटीस बजावली ते अधिकारी शिंदेंनाही मी विचारले आहे, तुम्ही माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.