‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेला वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरला, असा गंभीर आरोप शिबसेना नेते संजय राऊत यांनी केला. याप्रकरणी त्यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने समन्स बजावला. या दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला, ज्यावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. मात्र हा निर्णय सोमवारी, ११ एप्रिल रोजीच देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनीही सोमय्या पिता-पुत्रांचा शोध सुरु केला आहे. त्यांना अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पोलिसांची अटकेची तयारी सुरु
आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांच्या विरोधात राज्य सरकारला पुरावे दिले. त्यानुसार आर्थिक गैरव्यवहार विरोधी विभागाने याची दखल घेत सोमय्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्याप्रमाणे त्यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने समन्स पाठवला आहे. या समन्सनुसार, किरीट सोमय्या यांना 9 एप्रिल रोजी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र सोमय्या आलेच नाही. त्यांनी सोमवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सोमय्या यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुंदरगी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने याबाबतचा अंतिम निर्णय राखून ठेवत संध्याकाळी निकाल देण्याचे ठरवले. दुसरीकडे पोलिसांनीही सोमय्यांना अटक करण्याची तयारी केली आहे.
सोमय्या गायब
सध्या सोमय्या पिता-पुत्र हे दोघे गायब आहेत. ते मुंबई आणि दिल्लीतही नाहीत, असे म्हटले जात आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्र मेहुल चौकसीप्रमाणे देश सोडून पळून गेले असावेत, त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community