किरीट सोमय्या पुण्यात! अजित पवार निशाण्यावर!

मी पुणे येथे जाणार, अनिल परब खरमाटे घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळा याचा पाठपुरावा करणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

134

महाविकास आघाडीतील मंत्र्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आणि त्याअनुषंगाने ईडीकडून चौकशा सुरु आहेत. सोमय्या यांनी ११ मंत्र्यांची यादीच तयार केली आहे. महिनाभरापासून सोमय्या हे संबंधित मंत्री, आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत आहेत. सोमय्या गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी पुण्यात जाणार आहेत. त्यावेळी सोमय्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या घोटाळ्याचा आढावा घेणार आहेत.

जरंडेश्वर साखर कारखानाप्रकरणी पुणे बँकेला भेट देणार!

सोमय्या यांनी ट्विटद्वारे आपण पुण्यात जात असल्याची माहिती दिली आहे. ‘९ सप्टेंबरला मी पुणे येथे जाणार, अनिल परब खरमाटे घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळा याचा पाठपुरावा करणार आहे’, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. पुणे दौऱ्याच्या दरम्यान सोमय्या हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही भेट देणार आहेत. या बँकेमधून जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज देण्यात आले होते. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार हे शिखर बँकेचे अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी को ऑप बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात या बँकेत कथित २५ हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. जरंडेश्वर कारखाना अवसायनात निघाला, तेव्हा तो कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप झाला आहे. विशेष म्हणजे या कारखान्याला अजित पवारांच्या कारकिर्दीतच ४ सहकारी बँकांनी कर्ज दिले आहे. ज्यामध्ये सातारा जिल्हा बँकेचा सामावेश आहे. हा कारखाना अजित पवारांचे मामा राजेंद्र घाडगे यांचा आहे. ते या बँकेचे चेअरमन आहेत. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २२ ऑगस्ट २०१९ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत शरद पवारांना उत्तर देणार! 

सोमय्या हे ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन आणखी काही गौप्यस्फोट करणार आहेत. त्याच वेळी ते भावना गवळी प्रकरणी एनसीपी अध्यक्ष सहृद पवार यांनी आरोप केले आहेत, त्यालाही पत्रकार परिषदेत उत्तर देणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यानंतर सोमय्या हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयालाही भेट देणार आहेत. तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांना अडचणीत आणणारे परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याबाबतीतही आणखी काही खुलासे सोमय्या करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.