सोमय्या आता ‘या’ दिवशी कोल्हापुरात भिडणार!

किरीट सोमय्या यांनी त्यांच्या नियोजित दौऱ्याविषयी माहिती लेखी पत्राद्वारे कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक यांना कळवले आहे.

70

राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या १२७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची जोवर कागल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होत नाही, तोवर त्यांची चौकशी होऊ शकत नाही, त्यामुळे आज जमले नाही तरी पुन्हा मला कोल्हापुरात यावेच लागेल, असा इशारा देत भाजप नेते किरीट सोमय्या हे २० सप्टेंबर रोजी कराड येथूनच पोलिसांच्या आग्रहास्तव मुंबईला आले होते. मात्र आता सोमय्यांनी त्यांचा नव्याने कोल्हापूरचा दौरा निश्चित केला आहे. त्यामुळे आता तरी सोमय्या कोल्हापुरात जाऊ शकणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

काय म्हटले आहे सोमय्यांनी पत्रात?

किरीट सोमय्या यांनी त्यांच्या नियोजित दौऱ्याविषयी माहिती लेखी पत्राद्वारे कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक यांना कळवले आहे. ते पत्र सोमय्या यांनी ट्विट केले आहे. या पत्रात सोमय्या म्हणतात की, २० सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनामुळे आपण जमावबंदीचा आदेश लागू केला होता, त्यामुळे मला कोल्ह्यापुरतं प्रवेश बंदी करण्यात आली होती, मात्र आता आपण २८ सप्टेंबर रोजी कोल्हापूरला येत आहे. मला सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा, गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना घोटाळा आणि हसन मुश्रीफ यांच्या परिवाराचा घोटाळा या संदर्भात कोल्हापूरला जायचे आहे. माझ्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या बंदीचा आदेश २० सप्टेंबरला काढण्यात आला आहे. मी आता २७ सप्टेंबरला रात्री मुंबईहून निघून २८ सप्टेंबरला कोल्हापूरला येणार आहे. माझे पूर्वी दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व कार्यक्रम होणार आहेत. २८ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर दर्शन आणि आशीर्वाद घ्यायची इच्छा आहे, माझी योग्य सोय करावी, ही विनंती, असे सोमय्यांनी पत्रात लिहिले आहे.

(हेही वाचा : राज्य सरकार अशी करत आहे ओबीसींची फसवणूक! फडणवीसांनी दिली माहिती)

‘त्या’ साखर कारखान्याचीही पाहणी करणार!

दरम्यान, किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ संचालक असलेल्या कारखान्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. २० सप्टेंबरला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये, यासाठी सोमय्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी घालण्यात आली होती. परंतु, सोमय्या आता पुन्हा कोल्हापूर दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.