उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यामुळे अडचणी सापडले त्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विरोधात भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे मंगळवारी, १९ ऑक्टोबर रोजी ईडीच्या कार्यालयात जावून रितसर तक्रार करणार आहेत. त्यामुळे आता या कारखान्याची अधिकृतपणे चौकशी सुरु होईल. त्यामुळे पवारांनाही ईडीकडून समन्स मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
किरीट सोमय्या यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे ते ईडीच्या कार्यालयात जाऊन जरंडेश्वर साखर कारखान्यासंबंधी सर्व पुरावे सादर करणार आहेत. तसेच याविरोधात तक्रार करणार आहेत. त्यामुळे साहजिकच अजित पवार यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता दाट आहे. अशा वेळी पवारांनाही ईडी समन्स पाठवू शकते आणि पवारांनाही ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल, अशी शक्यता आहे.
काय आहेत अजित पवारांवर आरोप?
यासंबंधी किरीट सोमय्या यांनी २ दिवसांपूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पवारांवर आरोप केले होते. बेनामी गुंतवणूक करून, कंपन्यांचे जाळे निर्माण करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची खरेदी केली. सर्व नियमांचे उल्लंघन करून पवार यांनी स्वत:च हा कारखाना स्वत:ला विकला, असा आरोप केला होता. अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने जरंडेश्वर कारखान्याची खरेदी केली. या व्यवहाराच्या वेळी ते उपमुख्यमंत्री होते. अर्थमंत्री आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वाही होते. त्यांनी हा कारखाना स्वत:च स्वत:ला विकला. या प्रकरणाची चौकशी करताना अजित पवारांच्या बहिणीचा त्याच्याशी संबंध असेल, असे मला वाटले नव्हते. पण यातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे, असेही सोमय्या म्हणाले होते. जरंडेश्वरचे ९०.४ टक्के समभाग हे स्पार्कलिंग सॉइल कंपनीचे आहेत. ही कंपनी आधी जय अॅग्रोटेक नावे होती. स्पार्कलिंगची स्थापना अजित व सुनेत्रा पवार यांनी केली आहे. हा घोटाळा केवळ जरंडेश्वर पुरता मर्यादित नाही. ५७ कंपन्यांमध्ये अजित पवार यांची नामी-बेनामी गुंतवणूक आहे. यात काही ‘शेल’ कंपन्याही आहेत, असेही सोमय्या म्हणाले. त्यामुळे या प्रकरणी सोमय्या यांनी केवळ अजित पवार यांनाच लक्ष्य केले आहे.
Join Our WhatsApp Community