राज्यात परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. मात्र आता त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे अनिल परब हे विरोधकांच्या रडारवर आले असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नियमांची पायमल्ली करत अनिल परब यांनी शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम केलं. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
राज्यापालांकडे करणार हकालपट्टीची मागणी
दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांनी केलेल्या जमीन व्यवहाराची कागदपत्रं देखील सोमय्या यांनी सादर केली असून, त्यातल्या तरतुदींनुसार अनिल परब यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच, येत्या शुक्रवारी रत्नागिरीत जाऊन पोलिस तक्रार करणार असून, सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितली. राज्यपालांसोबतच्या भेटीत अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील करणार असल्याचे सोमय्यांनी यावेळी सांगितले.
Anil Parab indulged into Forgery, Fraud & constructed ₹10 crore illegal Sai Resort nx at Dapoli, Ratnagiri. Though the land is agricultural, construction done during COVID lockdown. V demand Criminal Action against Shivsena Minister Anil Parab.@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/FPRODgg2TA
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 19, 2021
(हेही वाचाः अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? आता दिल्लीचे पथक येणार मुंबईत)
काय आहे आरोप?
अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करुन, फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून २०२० मध्ये तीन मजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. अनिल परब यांनी १९ जून २०१९ रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर १ कोटीला ही जागा घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं, सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून आहेत. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी २६ जून २०१९ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचं म्हटलंय. पण तो दाखला दाखवलेला नाही, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
नियमांची केली पायमल्ली
यावेळी आरोप करताना त्यांनी संबंधित खरेदीखत आणि इतर कागदपत्र देखील पत्रकार परिषदेत दाखवली. ७ मे २०२१ रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करुन लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी १० महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. १० मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. ११ मे २०२१ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या काळासाठीचा ४ वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला, असे किरीट सोमय्यांनी सांगितलं.
(हेही वाचाः प्रताप सरनाईक गायब! किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप )
फौजदारी गुन्हा दाखल करा
कच्च्या झोपडीसाठी दिलेल्या परवानगीची मुदत उलटून गेल्यानंतर तीन मजली रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. २०१५-१६मध्ये या जागेवर कच्ची झोपडी बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्यात १२ महिन्यात ते बांधकाम करण्यासंदर्भात नमूद करण्यात आलं होतं, पण त्यांनी ते केलं नाही. २०२०च्या सुरुवातीपर्यंत तिथे कोणतंही बांधकाम नव्हतं. त्यामुळे अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असं किरीट सोमय्यांनी यावेळी सांगितलं.
Join Our WhatsApp Community