मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत झालेल्या उठावानंतर एकनाथ शिंदे गटाला राज्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक शिवसेनेचे नेते हे शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सातत्याने विरोधकांवर टीका करणा-या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
त्यामुळे राजकीय वर्तुळात एक नवे वादळ निर्माण झाले आहे. सय्यद यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या आणि माजी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
पेडणकेरांचा टोला
दिपाली सय्यद यांनी कोणाला आणि का भेटावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात एकप्रकारची स्पर्धा लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत जितकं चुकीचं बोलाल तितकं मोठं पद मिळेल, असे सध्या राज्यात सुरू आहे. त्यामुळे सय्यद किंवा इतर कोणालाही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी दिपाली सय्यद यांना लगावला आहे.
काय म्हणाल्या सय्यद?
उद्धव ठाकरे गटात सुषमा अंधारे यांच्या एंट्रीनंतर दिपाली सय्यद या नाराज असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौ-याबाबत बोलताना त्यांनी याआधीच महाराष्ट्राचा दौरा करायला हवा होता. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागत होते. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूची चार माणसे आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हते, अशी टीका सय्यद यांनी केली याला किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Join Our WhatsApp Community