“धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं हा निर्णय अपेक्षितच होता, कारण…”

144

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा अपेक्षितच होता, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणकरांनी म्हटले आहे. यावेळी शिंदे गट आणि भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. शिवसेना आमची आहे, असे सांगणाऱ्यांनी आपल्या आईलाच बाजारात विकल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरंतर हे सर्व दसरा मेळाव्यापासून सुरू झाले. शिवसेनेने दसरा मेळाव्यात आपली ताकद दाखवून दिली. मात्र त्यानंतर निर्णय घेण्याची घाई सर्व जनतेने पाहिली. शिवसेना पक्ष नव्हे तर कुटुंब आहे. त्यामुळे काहीही झाले तरी आम्ही खचणार नाही घाबरणार नाही, असे पेडणेकरांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यावर सुप्रिया सुळेंची शायराना अंदाजात प्रतिक्रिया, म्हणाल्या…)

पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या, धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठावले हा निर्णय अनपेक्षित नव्हता, असं काहीतरी होणार हे आम्हाला अपेक्षित होते. कारण ज्या पद्धतीने मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे यांना फुटून गेलेल्या लोकांकडून घेरण्याचा प्रयत्न होत होता, त्यावरून स्पष्ट दिसत होतं. की ज्या पद्धतीने वाचाळवीर बोलत होते, त्यावरून त्यांच्याकडून कोणीतरी ते बोलून घेत आहे, असे वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दोन्ही गटांना चिन्ह वापरण्यास बंदी

निवडणूक आयोगाने शनिवारी (८ ऑक्टोबर) अंतरिम निर्णय देताना सांगितले की, उद्धव ठाकरे गट किंवा शिंदे गटातील कोणीही अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरणार नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटालाही धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. किंबहुना शिवसेना पक्षाचे नावदेखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला पर्याय देणे बंधनकारक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.