मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या कधी कधी वाढली, जाणून घ्या

मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या ९ ने वाढवण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकास खात्यातून जाहीर करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा या महापालिकेच्या वाढणारे प्रभाग आणि वाढणारी सदस्य यांचा मागोवा घेण्यात आला आहे.

208

मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या सन २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल नऊने वाढवण्यात आली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रभागांची संख्या २२७ वरून  २३६ एवढी आहे. मात्र, मागील ३६ वर्षात एकूण ६६ नगरसेवकांच्या प्रभागांची संख्या वाढली गेली आहे. तर मागील २० वर्षात १५ प्रभागांची वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या ९ ने वाढवण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकास खात्यातून जाहीर करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा या महापालिकेच्या वाढणारे प्रभाग आणि वाढणारी सदस्य यांचा मागोवा घेण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या चिटणीस विभागाकडे प्राप्त असलेल्या अभिलेख्यावरून मुंबई महापालिकेत १९७२मध्ये ६४ सदस्य होते. ज्यातील ३२ सदस्य हे घरपट्टी भरणाऱ्यांच्या निवडणुकीतून निवडून आले होते आणि जे.पी.च्या  निवडणुकींतून १६ सदस्य निवडून आले होते. तर १६ सदस्यांची नेमणूक सरकारने केली होती. त्यावेळी घर पट्टी भरणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार असायचा,अशी माहिती मिळत आहे. १८७२च्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या महापालिकेची पहिली बैठक ही ४ सप्टेंबर १८७३ रोजी पार पडली होती. त्यानंतर १८८२ मध्ये सभागृहातील सदस्यांची संख्या ७२ एवढी झाली. यामध्ये ३६ सदस्य हे निवडणुकीत निवडून आले होते.

(हेही वाचा – नगरसेवकांच्या प्रभागांची संख्या वाढणार, पण सभागृहातील आसन क्षमता एवढीच)

मात्र, त्यानंतर १९२२मध्ये ही संख्या ७२ वरून वाढून १०६ एवढी झाली, तर पुढील पाच वर्षांमध्ये ही संख्या पुन्हा दोनने वाढून १०८ एवढी झाली. पुढील पाच वर्षांमध्ये पुन्हा यात पाच सदस्यांच्या वाढीची भर पडली. आणि ही संख्या ११७ वर पोहोचली. यामध्ये १०६ सदस्य हे निवडणुकीतून निवडून आले होते, तर उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले होते. परंतु शहर व उपनगराचे विलिनीकरण झाल्यानंतर १९५० मध्ये ही संख्या १८ सदस्यांनी वाढली. त्यामुळे १९५०मध्येही एकूण सदस्यांची संख्या १३५ एवढी झाली. ज्यामध्ये १३१ सदस्य हे निवडणुकीतून निवडून आले होते,असे महापालिकेच्या चिटणीस  विभागाच्या अभिलेख्यावरून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

मुंबईत महापालिकेत पहिली एकसदस्यीय पध्दत १९६६ मध्ये लागू झाली. यावेळी १९६८ मध्ये झालेल्या निवडणुकीत एक सदस्यीय मतदार संघातून पहिल्यांदाच १४० नगरसेवक  निवडून आले. सर्व नगरसेवक निवडून येणारी ही पहिली मुंबई महापालिकेची निवडणूक होती. त्यानंतर १० मे १९८५ मध्ये ही सदस्य संख्या ३० ने वाढवली गेली, त्यामुळे नगरसेवकांच्या प्रभागांची एकूण संख्या १७० पोहोचली गेली होती.

मुंबई महापालिकेच्या १९८५ स्थापन झालेल्या महापालिकेचा कालावधी १९९०ला संपुष्टाता आला होता. परंतु निवडणूक मतदार याद्या, प्रभागांची रचना, महिला आरक्षण आदी सर्व कारणांमुळे चार वेळा सहा महिन्यांची मुदतवाढ देत या महापालिकेची निवडणूक १९९०ऐवजी १९९२मध्ये घेण्यात आली आहे. याबाबत १९९१मध्ये नगरविकास खात्याने काढलेल्या अद्यादेशामध्ये महापालिकेच्या प्रभागांची संख्या २५० पर्यंत वाढवू शकता,अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या. परंतु १९९२च्या निवडणुकीपूर्वी प्रभागांची संख्या १७० वरून थेट २२१ एवढी करण्यात आली होती. तब्बल ५१ प्रभाग हे १९९२मध्ये वाढवण्यात आले होते. त्यानंतर २००२मध्ये ही संख्या २२१ एवढी करण्यात आली आणि आता २१ वर्षांनी पुन्हा ९ ने प्रभागांची तथा सदस्यांची संख्या ९ ने वाढवून ती २३६ एवढी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वाढलेल्या सदस्यांची तथा प्रभागांची आकडेवारी

सन १८७२ : एकूण ६४ सदस्य ( ३२ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १८८२ : एकूण ७२ सदस्य( ३६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९२२ : एकूण १०६ सदस्य (७६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९२८ : एकूण १०८सदस्य ( ७६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९३१ : एकूण ११२ सदस्य (८६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९३८: एकूण ११७ सदस्य (१०६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९५० : एकूण १३५ सदस्य ( १३१ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९६३: एकूण १४० सदस्य (एक सदस्य प्रभाग: सर्व सदस्य निवडणुकीतून निवडून आलेले)

सन १९८५ : एकूण १७० सदस्य

सन १९९२ : एकूण २२१ सदस्य

सन २००२ : एकूण २२७ सदस्य

सन २०२१-२२: एकूण २३६ सदस्य

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.