राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर देताना म्हटले की, राज ठाकरे तीन-चार महिन्यांतून एकदा व्याख्यान देतात आणि पुन्हा गायब होतात त्यांचे हेच वैशिष्ट्य आहे, असे म्हणत पवारांनी ठाकरेंना लक्ष्य केले. कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस जातीवाद पसरवत असल्याची टीका केली. राष्ट्रवादीच्या गेल्या चार पाच वर्षांच्या वाटचालींचा त्यांनी उल्लेख केला. ते काहीही म्हणू शकतात. त्यांच्या तोंडाला कुणी काही मर्यादा आणू शकत नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंवर केली.
राष्ट्रवादीचा दृष्टीकोण सर्वांना संधी देण्याची
राष्ट्रवादीचे नेतृत्व राज्यात कोण करत होते? महाराष्ट्राची विधानसभा, विधान परिषद घ्या. पहिल्यांदा मला वाटते छगन भुजबळ नेते होते. नंतर मधुकर पिचड नेते होते ते आदिवासी होते. भुजबळ कोणत्या समाजाचे आहेत हे सर्वांना माहीत आहे. अरुण गुजराथी होते. यावेळी पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली. याचे कारण त्यांना 30 वर्ष विधीमंडळात येऊन झाली. 30 वर्षे काम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी त्यातून ही निवड झाली. तशी सदस्यांची मागणी होती, असे सांगतानाच इतर जातीजमातीच्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा दृष्टीकोण राष्ट्रवादीचा आहे आणि पुढेही राहील, असे शरद पवार म्हणाले.
( हेही वाचा: ईलेक्ट्रिक बससाठी बेस्टला 264 कोटींचे बूस्टर! )
पवारांचा ठाकरेंना चिमटा
एक गोष्ट चांगली झाली. बरेच वर्ष राज ठाकरे भूमिगत झाले होते. याचा काही अंदाज येत नव्हता कुणाला. पण ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात यायला उत्सुक आहेत हे कालच्या सभेत दिसले. त्यांचे हेच वैशिष्ट्य आहे ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने ते काय करतात ते मला माहीत नाही, असा चिमटाही शरद पवार यांनी राज ठाकरेंना काढला.
Join Our WhatsApp Community