भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावला आहे. पवारांना ५ मे रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोगाच्या दालनात ही चौकशी होणार आहे.
जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा सर्वात आधी शरद पवार यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांच्या उद्देशावर संशय व्यक्त करत एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल व मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक यांचा समावेश असलेल्या द्विसदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली.
(हेही वाचा संजय राऊतांनी शरद पवारांना आणले अडचणीत)
पहिल्याच दिवशी पवारांना चौकशीसाठी बोलावले
आयोगाने यापूआधीही पवार यांना २३-२४ फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्याकरिता पाचारण केले होते. मात्र त्यावेळी पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र द्यायचे असल्याचे सांगून आयोगाला पुढची तारीख देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे आयोगाने मुंबईत ५ ते ११ मे या कालावधीत होणाऱ्या सुनावणीदरम्यान ५ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. चौकशी आयोगातर्फे मुंबईत ५ ते ७ मे आणि ९ ते ११ मे असे सहा दिवस साक्षी नोंदवण्याचे काम होणार आहे. त्यापैकी पहिल्याच दिवशी पवारांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान पोलिसांनी एकूण १६२ जणांवर गुन्हे दाखल केले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळे भीमा कोरेगावात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काही लोक अद्यापही तुरुंगात आहेत.
Join Our WhatsApp Community