एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवणाऱ्या व्यक्तींना उद्धव यांनी ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती’त मानाचे स्थान दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
( हेही वाचा : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी मिळणार)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती’ची बैठक पार पडली. त्यात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि निखिल वागळे यांची ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती’च्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला शिवसेना नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
पत्रकारितेतील कारकीर्दिनंतर कॉंग्रेसची राज्यसभेतील खासदारकी पदरात पाडून घेणाऱ्या कुमार केतकर यांनी नेहमीच शिवसेनाद्वेषाची भूमिका घेतली. शिवसेना-भाजपा सत्तेत असताना त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर कडवट टीका करीत त्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले होते. ”प्रबोधनकार ठाकरेंनी कायम अंधश्रद्धेवर आसूड ओढले. मात्र त्यांचा वारसा सांगणारी शिवसेना अंधश्रद्धा निर्मुलन विधेयकाला विरोध करते, ही परस्पर विरोधी भूमिका आहे”, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले होते.
केवळ अस्मितेवर अवघा महाराष्ट्र कवेत घेता येणार नाही. द्रमुक, तेलगू देसम किंवा अकाली यांच्याकडे अस्मितेपलीकडे त्यांच्या राज्याचा कार्यक्रम, तालुका पातळीवर संघटना आणि अनेक प्रांतिक नेते-कार्यकर्ते आहेत. शिवसेनेच्या शाखा आहेत, पण सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये सक्रीय अस्तित्व नाही. बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेसमोर हे मोठे आव्हान आहे. ‘मराठी माणूस’ हा जरी अभिमानाचा मुद्दा असला, तरी वैदर्भी मराठी, मराठवाड्यातील मराठी, खानदेशी मराठी हा त्याच ‘मराठी माणूस’ संकल्पनेचा घटक नसतो. त्यामुळे वर्तमान फार आशादायी दिसत नाही, अशी टीका केतकर यांनी एका लेखामधून केली होती.
…त्यानंतर भूमिका बदलल्या
शिवसेनेवर टीका केल्यामुळे पत्रकार निखिल वागळे यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले होते. बाळासाहेब हयात असताना आणि त्यांच्या पश्चात वागळे यांनी शिवसेनेविरोधातील भूमिका घेतली. मात्र, उद्धव ठाकरे कॉंग्रेसच्या कुशीत विसावल्यापासून वागळे आणि केतकर यांची शिवसेनेविषयीची भूमिका बदलली. टीकेची जागा गोडव्यांनी घेतली. त्याचेच हे फळ आहे का, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Join Our WhatsApp Community