Ladki Bahin : लाडक्या बहिणीनंतर लवकरच ‘लाडकी लेक’ मतदारांच्या भेटीला!

205
Ladki Bahin : लाडक्या बहिणीनंतर लवकरच ‘लाडकी लेक’ मतदारांच्या भेटीला!
  • सुजित महामुलकर

राज्यात ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin) योजना इतकी लोकप्रिय झाली की विरोधकांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही योजनेची लोकप्रियता कमी होत नाही. आता तर महायुतीमधील घटक पक्षांमध्येही श्रेयाची लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे. या योजनेनंतर विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी लेक’ ही योजनाही अमलात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘लाडकी लेक’ ही योजना सर्वसामान्यांसाठी नाही. तर सरसकट सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांच्या लेकी, हेच लाभार्थी असतील, अशी ही योजना आहे. थोडक्यात आणि थेट सांगायचे तर विविध पक्षाच्या नेत्यांच्या लेकींना येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. आता त्यांचे राजकारणी वडील किती जोर लावतात, तीच त्यांची लाभार्थी होण्यासाठीची पात्रता असेल.

ठाकरे कुटुंबाच्या सून अंकिता

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि ठाकरे कुटुंबाची सून अंकिता पाटील या ‘लेक लाडकी’ योजनेच्या एक लाभार्थी ठरण्याची शक्यता आहे. राज्य विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी भाजपाकडून हर्षवर्धन पाटील यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेला त्यांची कन्या अंकिता यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे करत असून ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांनी शरद पवार यांचे बोट पकडले तर अंकिता यांचा मार्ग सुकर होईल, अन्यथा हर्षवर्धन पाटील यांना अधिक प्रयत्न करावे लागतील. अंकिता या बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदुमाधाव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. (Ladki Bahin)

(हेही वाचा – BMC School : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रशासकीय कामांत रमले महापालिका शिक्षक, ज्ञानार्जनाचे काम करणार कोण?)

राजकीय भवितव्य चांगले

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा त्याग करत भाजपाचा झेंडा हाती घेतलेले, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया, या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्रीजयाबद्दल विचारले असता चव्हाण म्हणाले होते की, तिची इच्छा असेल तर तिने स्वतः तिकीटासाठी प्रयत्न करावे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्यापूर्वी ज्या गुरुजींचा सल्ला घेतला त्यांनीही श्रीजया यांचे राजकीय भवितव्य चांगले असल्याचे भाकीत वर्तवले आहे.

पुन्हा विखे विरुद्ध थोरात

काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री यादेखील राजकारणात असून संगमनेर विधानसभा मतदार संघात त्या सक्रिय आहेत. लोकसभा निडावणुकीत पराभव झाल्यानंतर संगमनेर विधानसभा मतदार संघात सुजय विखे यांनी काम सुरू केल्याचे समजते. राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात या जुन्या संघर्षानंतर आता येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा सामना झाला तर आश्चर्य वाटू नये. काही दिवसांपूर्वी जयश्री यांनी संगमनेर शहरात इंदिरा महोत्सव नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात जयश्री यांनी निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त करून त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. (Ladki Bahin)

(हेही वाचा – Dadar केशवसुत उड्डाणपुलाखाली पोलिस बिट चौकींचे दरवाजे दोन्ही बाजूला करा, नागरिकांची मागणी)

मुंबईतही एक लाडकी लेक

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या गेल्या काही दिवसंपासून मुंबईतील अणुशक्ती नगर या विधानसभा क्षेत्रात सक्रिय झाल्या असून रक्षाबंधनच्या दिवशी अजित पवार यांनी ‘जनसन्मान’ यात्रेचा एक कार्यक्रम अणुशक्ती नगर क्षेत्रात घेतला आणि यावेळी भाषतात अजित पवार यांनी सना यांना पक्षाचे प्रवक्ते पद जाहीर केले. नवाब मलिक यांना भाजपा-सेनेकडून (शिंदे) विरोध होत असल्याने सना यांना येत्या विधानसभेला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. अणुशक्ती नगर मतदार संघ राष्ट्रवादीकडे असल्याने सना यांना तिकीट मिळण्यात फार अडचणी निर्माण येणार नाहीत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रयत्नांची पराकाष्ठा

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी यांनी २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि त्यांना भाजपाकडून मुक्ताई नगर मतदारसंघातून तिकीटही मिळाले. मात्र, अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा २३०० मतांनी पराभव केला. पुढे २०२० मध्ये रोहिणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शप) प्रवेश केला आणि आता त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. एकनाथ खडसेदेखील पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत असल्याने रोहिणी यांना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, यात शंका नाही.

याशिवाय आणखी काही ‘लाडक्या लेकी’ निवडणुकीच्या तयारीत आहेत, त्यांचे चेहरेही लवकरच जनतेसमोर येतील, मात्र जनता, मतदार या लेकींना स्वीकारतात का? हे येणाऱ्या २-३ महिन्यातच कळेल. (Ladki Bahin)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.