लखीमपूर खेरी प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल! सुनावणी होणार

या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराबाबत संपूर्ण देशभर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, गुरुवारी याबाबत सुनावणी होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार आहे. खंडपीठात रामण्णा यांच्यासह न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती हिमा कोहली यांचाही खंडपिठात समावेश असणार आहे.

(हेही वाचाः धक्कादायक! लखीमपूरमध्येही खलिस्तान्यांचा सहभाग?)

अनेकांवर गुन्हे दाखल

Violence in Lakhimpur Kheri leading to loss of life असे या प्रकरणाला शीर्षक देण्यात आले आहे. लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतक-यांसह काही भाजपा कार्यकर्ते अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या हत्याकांडात केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचा सहभाग असल्यामुळे याबाबत देशभरात केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचाः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की ‘रक्त महोत्सव?’ सामनातून केंद्र सरकारवर आगपखड)

काय आहे प्रकरण?

अजय मिश्रा यांच्या मूळ गावी एका कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. कृषी कायद्यांविरोधात गेले अनेक महिने आंदोलन करणा-या शेतक-यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करत होते. या आंदोलनकारी शेतक-यांना आशिष मिश्रा यांनी गाडीखाली चिरडले असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. उत्तर प्रदेश पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. या प्रकरणात अजूनही कोणावर कारवाई झाली नसल्याने विरोधक मोदी सरकारचा निषेध करत आहेत.

महाराष्ट्र बंदची हाक

या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्य मंत्रीमंडळात चर्चा होऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे येत्या 11 ऑक्टोबर रोजी राज्यभर महाराष्ट्र बंद पुकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसने या घटनेच्या निषेधासाठी महाराष्ट्र बंदचा नारा दिला होता. त्याला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी दुजोरा दिला आहे.

(हेही वाचाः महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आक्रमक! ‘या’ दिवशी पुकारला ‘महाराष्ट्र बंद’)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here