पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याचा ताबा मिळवण्याच्या संदर्भात २ एप्रिल २०२१ या दिवशी राज्याच्या गृहमंत्रालयाला पत्र लिहिले होते; परंतु त्या वेळी राज्य सरकारकडून त्यांना उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ललित याचा पहिला ड्रग्ज कारखाना सापडल्यानंतर २०२१ साली त्याची एकदाही चौकशी होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केला. १२ डिसेंबर या दिवशी ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) संदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
२०२१ साली ललित पाटील याचा ड्रग्ज कारखाना सापडल्यानंतर त्याचा ताबा घेऊन चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गृह विभागाला पत्र लिहिले. ललित पाटील हा अमली पदार्थांसंदर्भातील गंभीर गुन्ह्यांत सहभागी आहे. त्याचा ताबा घेण्याची आवश्यकता होती; पण तसे झाले नाही. त्यामुळे तो ‘एन्.सी.आर्.’मध्ये (नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट) गेला. आता १५ दिवसांहून अधिक दिवस झाल्यामुळे त्याचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अपील करावे लागेल. त्यासाठी अनुमती देण्यात यावी, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते; परंतु तत्कालीन सरकारने त्यास अनुमती दिली नाही. त्यामुळे गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या ललित पाटील याची १ दिवसही पोलीस चौकशी झाली नाही. सध्या त्याची चौकशी वेगळ्या गुन्ह्यात चालू आहे; पण पहिला ड्रग्ज कारखाना सापडल्यानंतर एकदाही चौकशी झालेली नाही. या तस्करी प्रकरणात पोलिसांचा सहभाग नाही; परंतु पोलिसांकडून ललित पाटील याला साहाय्य झाले हे खरे आहे. त्यामुळे ४ जणांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३११ अंतर्गत बडतर्फीची कारवाई करण्यात आली, तर ६ जणांना निलंबित करण्यात आले आहे. ‘ड्रग्ज’च्या संदर्भात आमच्या सरकारची ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ आहे. त्यामुळे प्रथमच थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यापुढे पोलीस दलातील कोणाचाही ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आढळल्यास थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल. त्याशिवाय, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनाही पदमुक्त केले आहे. त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आल्यास अटकही केली जाईल, असे त्यांनी सभागृहाला अश्वस्त केले. ‘इन्स्टाग्राम’ हे आता अमली पदार्थांची नवी बाजापेठ म्हणून समोर येत आहे. तेथून मागणी करून ‘ऑनलाईन’ पैसे दिले जात आहेत. त्यानंतर ‘कुरिअर’ने पुरवठा होतो. डार्कनेटच्या माध्यमातून व्यवहार चालू आहेत. त्यामुळे सगळ्या कुरिअर आस्थापनांना पडताळणी करूनच कुरिअर पुढे पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत. ड्रग्ज तस्करीची साखळी मोडून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत ड्रग्ज पेडलरवर कारवाई करून आपण थांबायचो; पण आता आपण मुळासकट रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community