मागील ५ महिन्यांत सरकार झोपले होते का? चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आता सरकारने ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प सुरू केले आहेत, काही दिवसातच हे प्रकल्प सुरु होतील, असे सांगितले आहे. मात्र सरकारचा हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. 

125

राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना दुसरी लाट येणार होती, याची कबुली दिली, मग मागील ५ महिने सरकारने तयारी का केली नाही, सरकार झोपले होते का, असे टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सोडले.

तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार! 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आता सरकारने ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प सुरू केले आहेत, काही दिवसातच हे प्रकल्प सुरु होतील, असे सांगितले आहे. मात्र सरकारचा हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखा आहे. जर सरकारने ५ महिन्यांपूर्वीच जर ऑक्सिजननिर्मितीचे प्रकल्प उभे केले असते, तर आज ऑक्सिजनसाठी धावाधाव करण्याची वेळ आली नसती, असेही पाटील म्हणाले. केंद्राने ऑक्सिजनचा 500 मेट्रिक टनांचा अधिक पुरवठा मंजूर केल्यामुळे राज्याची गरज जेमतेम भागते हे कबूल केले ते बरे झाले. राज्याला पंतप्रधानांच्या सूचनेनुसार रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला असल्याचेही त्यांनी मान्य केले हे सुद्धा चांगले झाले, असेही पाटील म्हणाले.

(हेही वाचा : दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात? )

आता तरी केंद्रावर आरोप करू नका!

आता 18 ते 44 वयोगटासाठी 12 कोटी लसी एक रकमी विकत घेण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने राज्य सरकारांना लसींची थेट खरेदी करण्याची परवानगी दिली असताना त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या मागे लपण्याची गरज नव्हती. लसींच्या उत्पादन व पुरवठ्याला मर्यादा आहे. त्यामुळे जशी लस उपलब्ध होईल, तशी दिली जाईल, असे मुख्यमंत्री आता सांगतात आणि तरुणांना केवळ नोंदणीनंतर संदेश आल्यानंतरच लसीकरणाला जा असेही सांगतात. त्यांनी अशीच जाणीव ठेवून 45 पेक्षा अधिकच्या वयाच्या नागरिकांच्या लसीकरणात शिस्त ठेवली असती तर गेले काही दिवस राज्यात जो लसीकरणाचा गोंधळ चालू आहे तो झाला नसता आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात मनस्ताप सहन करावा लागला नसता, असेही पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.