लतादीदी गायन सोडणार होत्या, तेव्हा वीर सावरकर यांनी दिला होता ‘हा’ सल्ला!

132

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आयुष्यात क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर हे पूजनीय होते. त्यांची वीर सावरकर यांच्यावर अपार श्रद्धा होती. वीर सावरकरांच्या भेटीच्या वेळी लतादीदी यांनी त्यांचे सारे आयुष्य देशकार्यासाठी समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी वीर सावरकर यांनी जो सल्ला दिला, त्यामुळे लतादीदी गायन क्षेत्रात सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचल्या.

लतादीदी यांच्या आयुष्यातील एक महत्वाच्या प्रसंगाची आठवण सुप्रसिद्ध कलाकार डॉ. हरीश भिमानी यांनी करून दिली. ‘महाभारत’ या जगप्रसिद्ध मालिकेत ‘मैं समय हूं’ असा आवाज डॉ. भिमानी यांनी दिला आहे. भोपाळ येथे तीन दिवसीय ‘चित्र भारती चित्रपट महोत्सव’ सुरु आहे, त्यामध्ये ‘यादे: लता मंगेशकर’ या कार्यक्रमात डॉ. भिमानी सहभागी होते. लतादीदींनी वीर सावरकर यांना विचारले होते की, मला देशसेवा करायची आहे, त्यासाठी गायन सोडावे लागले तरी चालेल. त्यावेळी मात्र वीर सावरकर यांनी त्यांना समजावत सांगितले की, ‘तुम्ही करत असलेले कार्य हे सुद्धा देशसेवेचे एक माध्यम आहे.’ वीर सावरकर यांनी तेव्हा दीदींना समजावले नसते, तर कदाचित लतादीदींनी गायन सोडले असते.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चित्रपटाला विरोध, पु.ल. देशपांडेंची नकारात्मक भूमिका दाखवणा-या मांजरेकरांवर सावरकरप्रेमींना नाही विश्वास!)

लतादीदी शिवरायांना देव मानत

लतादीदींना वीर सावरकर यांच्याबद्दल आदर होता आणि तो उघडपणे त्या व्यक्त करत असत. लतादीदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानले होते. सारे जग लतादीदींना सरस्वती मानते, पण त्या स्वत:ला मीरा मानत होत्या. त्यांनी त्यांचे सगळे जीवन श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले होते. लतादीदी केवळ श्रीकृष्ण प्रेमीच नव्हत्या, तर त्या श्रीकृष्ण उपासकही होत्या. श्रीमद्भागवत गीता हा त्यांचा आवडता ग्रंथ होता.

लतादीदींना भेटणे माझे सौभाग्य – डॉ. हरीश भिमानी

डॉ. भिमानी यांनी त्यांची आणि लतादीदी यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. जेव्हा मी लतादीदींना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मला माहीत नव्हते की, ही माझी पहिली परीक्षा होती. मी ती परीक्षा उत्तीर्ण झालो आणि मला काम मिळत राहिले. मला स्वतः लतादीदी यांनी आमंत्रित केले होते, हे माझे भाग्य होते, असेही डॉ. भिमानी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.