सुशांत सावंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाएकी शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरवला, ज्याला फारच मोजक्या जणांना ऐनवेळी निमंत्रण पाठवले, त्यासाठी आंबेडकर चळवळीतील नेत्यांचाही त्यांना विसर पडला, याचा व्हायचा तो परिणाम झाला, मुख्यमंत्र्यांच्या या घिसाडघाई कारभारामुळे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. यामुळे निमंत्रितांपैकीहि बरेच नेते अनुपस्थित राहिल्याने मुख्यमंत्र्यांना अखेर हा हा कार्यक्रम रद्द करावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता इंदू मिल येथील नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण ऐनवेळी देण्यात आल्याने मंत्री नाराज होते. त्यातच या कार्यक्रमाला फक्त १६ जणांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि ऍड. प्रकाश आंबेडकर, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, आंबेडकरी चळवळीचे नेते यांची नावे आमंत्रितांमध्ये नव्हती. शिवाय मंत्रिमंडळातील अनेकांना आजच्या कार्यक्रमाची माहिती नव्हती. अखेरच्या क्षणी इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या घिसाडघाई कारभारामुळे प्रमुख नेते नाराज झाले, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत याची माहिती मिळताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा कार्यक्रम रद्द केला. अजित पवार पहाटेच गेले पुण्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील ऐनवेळी निमंत्रण देण्यात आल्याने त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत पहाटे सहा वाजताच पुणे येथील संत तुकाराम मेट्रो स्टेशनचा आढावा घेण्यासाठी पुणे गाठले. यावेळी त्यांनी संत तुकारामनगर ते पिंपरी असा मेट्रोचा प्रवासही केला. घडल्या प्रकाराचे राजकारण करू नका – मुख्यमंत्री इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश मी दिले आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे
|
Home सत्ताबाजार ऐनवेळी मिळाले निमंत्रण, मंत्री-नेते नाराज, इंदू मिल डॉ. आंबेडकर स्मारक पायाभरणी कार्यक्रम...