फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जावे, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने आतापर्यंत पाठपुरावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मार्सेय (मार्सेलिस) येथे स्मारक होण्याच्या आशा अधिक पल्लवीत झाल्या आहेत, ही या वर्षीच्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला मिळालेली आनंददायी बातमी आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, २१ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्मारक कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह-कार्यवाह स्वप्नील सावरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत या संबंधात त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित माझी जन्मठेप पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती My transportation of life देऊन नार्वेकर यांचे अभिनंदन केले.
(हेही वाचा हिंदूंच्या धर्मांतरासाठी ॲमेझॉन पुरवते पैसा? राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची नोटीस)
स्मारकातर्फे विधानसभा अध्यक्षांना अभिनंदन पत्र
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना अभिनंदन पत्रही देण्यात आले. ”दिवाळीच्या पूर्वसंध्येला हिंदुस्थानातील सर्व राष्ट्रप्रेमींसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मार्सेलिस येथे स्मारक होणार असल्याची वार्ता आनंद द्विगुणित करणारी आहे. फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जावे, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची आणि सर्व राष्ट्रप्रेमींची इच्छा होती. आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन स्मारक उभारणीबाबत सविस्तर चर्चा केली, त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. स्मारकास खात्री आहे की लवकरच तेथे स्मारक उभारून राष्ट्रचेतना जागवणारे कार्य आपण पूर्णत्वास न्याल. मार्सेलिस येथील स्वातंत्र्यवीरांचे स्मारक उभारण्यासाठी स्मारक आपणास पूर्ण सहकार्य करेल, अशी आम्ही ग्वाही देतो”, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community