Disha Salian प्रकरणावरून विधान परिषदेत रणकंदन; सत्ताधारी-विरोधक आक्रमक

दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावरून सुरू झालेली चर्चा पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत गेली आणि सभागृहात तणाव वाढला. चित्रा वाघ यांनी विरोधकांवर महिलांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

75

विधान परिषदेत गुरुवारी, २० मार्चला दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावरून तुफान रण माजले. भाजपच्या आमदार चित्रा किशोर वाघ यांनी या प्रकरणात एसआयटी रिपोर्ट सार्वजनिक करून पुन्हा सखोल तपासाची मागणी केली असता, विरोधी पक्षाच्या उबाठा गटाने त्यांना पूजा चव्हाण प्रकरणावरून घेरण्याचा प्रयत्न केला. यावर चित्रा वाघ यांनी सभागृह दणाणून सोडले. उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांना चोख प्रत्युत्तर दिले. पूजा चव्हाणच्या बाबतीत मी लढले, पण संजय राठोडला उद्धव ठाकरे यांनी क्लीन चिट का दिली? याचा थेट उध्दव ठाकरे यांना जाब विचारण्याचे आव्हान दिले. “हिंमत असेल तर चला, आपण उध्दव ठाकरे यांना जाब विचारायला जाऊ,” असे त्यांनी ठणकावले.

दिशा सालियन प्रकरणावर चर्चा

शिवसेना (शिंदे गट)च्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सभागृहात दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली. याला पाठिंबा देत चित्रा वाघ यांनी म्हटले, “एसआयटीचा रिपोर्ट सार्वजनिक करावा आणि गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी.” दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करताच या प्रकरणाचे पडसाद सभागृहात उमटले. मात्र, यावर उबाठा गटाचे अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर वैयक्तिक टीका करत पूजा चव्हाण प्रकरणाचा उल्लेख केला आणि मनीषा कायंदे यांच्यावरही खालच्या शब्दांत आरोप केले.

चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना संतापून प्रत्युत्तर दिले. “जेव्हा एखाद्या महिलेला तर्काने उत्तर देता येत नाही, तेव्हा पुरुष तिच्या वैयक्तिक गोष्टींवर टीका करून तिचे पाय खेचतात. हीच प्रचिती आज सभागृहात आली, असे म्हणत त्यांनी परब यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी पुढे सांगितले, “संजय राठोड यांना क्लीनचिट देणारे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते. मी पूजा चव्हाणला न्याय मिळावा म्हणून जीवाच्या आकांताने लढले. पण उध्दव ठाकरेंनी संजय राठोडला वाचवले नसते, तर ही वेळ आलीच नसती. हिंमत असेल तर चला, उध्दव ठाकरेंना जाब विचारायला जाऊ.”

(हेही वाचा शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी; आमदार Chitra Wagh यांचा सभागृहात प्रस्ताव)

चित्रा वाघ यांनी विरोधकांच्या महिलाविरोधी भूमिकेकडेही लक्ष वेधले. “एक वडील आपल्या मुलीसाठी न्याय मागत असताना विरोधक राजकीय बचावासाठी सभागृहातील महिलांचा अपमान करतात. आजच सुनीता विल्यम्स यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला असताना विरोधकांनी महिलाविरोधी भूमिका घेतली, असे त्यांनी निदर्शनास आणले. त्यांनी विरोधकांचे वर्तन हे समाजातील महिलांबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असल्याचा आरोप केला. (Disha Salian)

दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावरून सुरू झालेली चर्चा पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत गेली आणि सभागृहात तणाव वाढला. चित्रा वाघ यांनी विरोधकांवर महिलांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. “संवेदनशील मुद्द्यांचे गांभीर्य न जाणता विरोधक गोंधळ घालत आहेत. सभागृहात महिलांना अशी वागणूक मिळत असेल, तर समाजात त्यांचा किती आदर असेल?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. आमदार चित्रा वाघ यांनी दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणात तपासाची मागणी करताना उध्दव ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. सभागृहातील या घडामोडींमुळे उबाठा गट आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. चित्रा वाघ यांच्या संतापानंतर विरोधकांची बोलती बंद झाली. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनाबाहेरही उमटण्याची शक्यता आहे. आता दिशा प्रकरणातील तपास आणि कोर्टाचा निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.