राज्यसभेच्या निवडणुकीचा धुराळा शांत होत नाही तोच आता विधान परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा सुरु झाला आहे. राज्यसभेत महाविकास आघाडी मजबूत राहिली नसल्याचे समोर आले आहे. यात शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला असून तो शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता काँग्रेसची विधान परिषदेची दुसरी जागा अडचणीत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसने शब्द न पाळल्याचा बसणार फटका
जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना होऊन सरकार स्थापन झाले, त्यावेळी पहिल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना अतिरिक्त एक जागा सोडण्यात यावी, असे सांगितले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. या राज्यसभेच्या निवडणुकीत आधी ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला अतिरिक्त मते देण्याचे आश्वासन दिले. तसेच काँग्रेसने त्यांचा उमेदवार न देता त्यांची सगळी मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाऱ्याला द्यावीत, त्याबदल्यात काँग्रेसला विधान परिषदेत अतिरिक्त जागा देण्यात येईल, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु काँग्रेसच्या हायकमांडने हा प्रस्ताव फेटाळून लावत इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची अवस्था नाजूक बनली. राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांना अतिरिक्त मते दिली, त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याची मते कमी झाली. परिणामी शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला आहे.
(हेही वाचा Presidential Election 2022: ममता दीदींनी सर्व विरोधकांची बैठक बोलावली, शिवसेनेने मात्र पाठ फिरवली!)
म्हणून शिवसेना ताठर भूमिकेत राहिली
- आता विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीने एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
- शिवसेनेने सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे.
- काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
- विधासभेत संख्याबळ पाहता शिवसेनेकडे ५५, राष्ट्रवादीकडे ५४ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत.
- विधान परिषदेसाठी निवडून येण्यासाठी २७ मतांची गरज आहे.
- त्यानुसार शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येतील, राष्ट्रवादीचे २ उमेदवार येतील मात्र काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाऱ्यासाठी १० मतांची गरज भासणार आहे.
- राज्यसभेसाठी काँग्रेसने उमेदवार दिल्याने यावेळी शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा करणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा विधान परिषदेचा दुसरा उमेदवार धोक्यात येणार आहे.