- खास प्रतिनिधी
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सहा विधान परिषद सदस्य विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त पाच आणि विधानसभेत निवडून गेलेले सहा, अशा एकूण ११ जागा विधान परिषदेत रिक्त झाल्या असून त्यावर कुणाची वर्णी लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये भाजपाच्या सात जागांचा समावेश असून त्यावर भाजपा कार्यकर्त्यांची निवड होणार की बाहेरच्या नेत्यांना संधी दिली जाणार, यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. (BJP)
प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासारखे अनेक पदाधिकारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली, मात्र काही बंडखोरांची समजूत काढण्यात भाजपाला यश आले. विधान परिषदेवरील ५ रिक्त जागांबाबत किमान ५० पदाधिकाऱ्यांना आश्वासन देऊन थंड करण्यात यश आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (BJP)
(हेही वाचा – विधानसभा निवडणुकीत Maha Vikas Aghadi चे २८ उमेदवार तिसऱ्या स्थानावर, वाचा उमेदवारांची नावे)
कदम यांना न्याय मिळणार?
मात्र, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकऱ्यांना आता न्याय मिळणार का असा प्रश्न केला जात आहे. कराड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आणि भाजपाचे अतुल भोसले विजयी झाले. कराड दक्षिणमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा उमेदवार निवडून आला आहे. याचे मोठे श्रेय सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना जाते. कदम यांच्यासारख्या पदाधिकऱ्यांना विधान परिषदेवर पाठवून आणखी चांगले काम करण्याची संधी दिल्यास कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण होतो आणि ते आणखी जोमाने कामाला लागतात, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत. (BJP)
लोकसभा विजयात सिंहाचा वाटा
बीए आणि फार्मसीचा डिप्लोमाधारक, ५२ वर्षीय धैर्यशील कदम हे विविध सहकारी संस्थांशी संबंधित असून कुशल संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे. लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून उदयनराजे भोसले यांच्या विजयातही कदम यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांची विधान परिषदेवर निवड झाल्यास सातारा जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. (BJP)
(हेही वाचा – Virat Kohli : विराटच्या शतकानंतर ड्रेसिंग रुममध्ये गंभीर, विराटची भावपूर्ण गळाभेट)
आता तरी न्याय होईल?
भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा तर प्रत्येक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत होते मात्र वर्णी तिसऱ्याचीच लागते. भंडारी यांच्यावरही अनेक वर्षे अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी तरी भंडारी यांना न्याय मिळेल का? असा सवाल केला जात आहे. (BJP)
शेट्टी परिषदेवर?
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना लोकसभेचे तिकीट नाकारले. शेट्टी यांचा जनाधार मोठा असल्याने राज्यसभा खासदार पीयूष गोयल यांनी त्यांच्या मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघाची निवड केली. निवडून येण्यासाठी सुरक्षित अशा या लोकसभा मतदारसंघातून गोयल यांना तिकीट देण्यात आले. त्यानंतरही शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली नाही. विधानसभेला बोरिवली मतदारसंघातून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यावर बाहेरचा उमेदवार नको, असे म्हणत शेट्टी यांनी मतदारांच्या आग्रहास्तव अपक्ष अर्ज दाखल केला. अखेर पक्षाने समजूत काढल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि उपाध्याय निवडून आले. आता शेट्टी यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी बोरिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. (BJP)
(हेही वाचा – मुंबई महापालिकेसाठी Shiv Sena UBT चा सावध पवित्रा)
उबाठाचे गोरे परिषदेवर?
भाजपा मान-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शिवसेना उबाठा नेते शेखर गोरे यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट विधानसभा नाकरल्यानंतर शेखर यांनी जयकुमार यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार केला. विधानसभा निकाल लागल्यानंतर जयकुमार गोरे निवडून आले आणि शेखर यांना सुगीचे दिवस सुरू झाले. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर वायरल होत आहे. त्यात फडणवीस यांनी शेखर यांची विधान परिषदेवर वर्णी लावणार असल्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. अशा बाहेरून १५ दिवसांपूर्वी आलेल्या लोकांना विधान परिषदेवर घेतल्यास पक्ष कार्यकर्ते नाराज होतात आणि त्याचा फटका भविष्यात बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत एका प्रदेश पदाधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. (BJP)
विधान परिषदेतून, विधानसभेत
भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे कामठीमधून, गोपीचंद पडळकर यांनी जत मतदारसंघातून, रमेश कराड यांनी लातूर ग्रामीणमधून आणि प्रविण दटके यांनी नागपूर-मध्यमधून विधानसभा निवडणूक जिंकली. याशिवाय शिवसेना (शिंदे) आमश्या पाडवी अक्कलकुव्यातून विजयी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे उमेदवार राजेश विटेकरांनी पाथरीतून बाजी मारली. त्यामुळे विधान परिषदेचे सहा आमदार आता विधानसभेत जाणार असून परिषदेतील रिक्त जागांसाठी प्रचंड रस्सीखेच आतापासूनच सुरू झाली आहे. त्यात निष्ठावंत यशस्वी होतात की बाहेरून आलेले, ते लवकरच कळेल. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community