आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधिमंडळाची नोटीस

पक्षादेशाचे उल्लंघन, आठवडाभरात उत्तर द्यावे!

148

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि त्यानंतर झालेला विश्वासदर्शक ठराव या दोन्हींसाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून आपापल्या सोबतच्या सदस्यांना पक्षादेश (व्हीप) बजावण्यात आला होता. यामध्ये आपलाच व्हीप अधिकृत असा दोन्ही गटांचा दावा आहे. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांच्या व्हीपचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विधिमंडळ सचिवालयाने दोन्ही गटांना नोटीस पाठवली आहे.

(हेही वाचा- PanCard च्या 10 आकडी नंबरमधील रहस्य जाणून घ्या, होईल खूप फायदा!)

आठवडाभरात उत्तर द्यावे!

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या ५५ पैकी ५३ आमदारांना विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये शिवसेनेच्या आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

आदित्य ठाकरेंना वगळले

विशेष म्हणजे आदित्य ठाकरे विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहाबाहेर होते. मात्र आदित्य ठाकरेंना वगळले असून त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली नाही. सरकार स्थापना, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि त्यानंतर झालेला विश्वासदर्शक ठराव आदी विविध घडामोडींविरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात एकत्रित महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्याआधी ही नोटीस बजावली आहे.

विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश बाजूला सारून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्यात यावी, अशी याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली होती. मात्र या यादीतून आदित्य ठाकरेंचे नाव वगळ्यात आले होते. दरम्यान, बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही, असे गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.