“योग्य वेळी ताकद दाखवून देऊ!” संभाजी राजेंच्या या इशाऱ्यामागे दडलंय काय?  

संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी जाहीर करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

74

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्याआधी त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्याची सुरुवात मात्र एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून झाल्याने राजे भाजपाला सोडून एनसीपीत जाणार अशी चर्चा सुरु झाली. संभाजी राजे जेव्हा प्रकाश आंबेडकरांना भेटले, तेव्हा ‘बहुजनांचा पाठिंबा असेल, तर स्वतंत्र पक्ष काढू’, अशी घोषणा केली. त्यानंतर राजेंनी ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी भूमिका मांडणार असे जाहीर केले. त्या दरम्यान भाजपचे चंद्रकांत पाटील, निलेश राणे आणि आता नारायण राणे यांनी राजेंवर टीका केली, त्यावर राजेंनी ‘योग्य वेळी ताकद दाखवून देऊ’, असे ट्विट करून भाजपाला गर्भित इशारा दिला आहे. आता या इशाऱ्यामागे नक्की काय दडले आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

काय म्हणाले संभाजी राजे? 

संभाजी राजेंनी ट्वीटद्वारे भाजपाला इशारा देताना म्हटले कि, छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.

संभाजी राजेंवर भाजप नेत्यांकडून टीका!

संभाजी राजे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजी राजे यांनी ‘पक्षाने त्यांना किती मानसन्मान दिला, हे ते सांगत नाहीत’, अशा शब्दांत राजेंच्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकांवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. त्यानंतर भाजपचे सरचिटणीस निलेश राणे यांनी राजेंवर टीका केली. आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी टीका करताना म्हणाले कि, संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?

(हेही वाचा : घोटाळेबाज मेहुल चोक्सीला भारतात आणणार ‘या’ लेडी सिंघम)

देवेंद्र फडणवीस यांचा सबुरीचा सल्ला! 

या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे नेते राजेंवर करत असलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त केली. राजेंची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, अशी त्यांची भूमिका आहे आणि ती स्वागतार्ह आहे. मात्र त्याच्यावर टीका करण्यात येऊ नये, हे चुकीचे आहे. तसे पक्षातील नेत्यांना सांगण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

६ जूनला संभाजी राजे भूमिका मांडणार! 

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारकडे ५ मागण्या केल्या होत्या. त्यासाठी ६ जूनपर्यंत अल्टिमेम दिला होता. या दिवशी शिवराज्याभिषेक दिन आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर रायगडावरून पुढील भूमिका जाहीर करणार, असेही जाहीर केले. त्याप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनाला २ दिवस उरले आहेत. त्यावेळी संभाजी राजे नवीन पक्षाची घोषणा करतात कि खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षांतर करणार अथवा स्वतःच्या बळावर आरक्षणासाठी पुढील आंदोलनाची घोषणा करून अखिल मराठा समाजाचे एकमेव नेता होण्याची तयारी करणार, हे ६ जून रोजी स्पष्ट होणार आहे.

(हेही वाचा :ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री पाच सुपर मुख्यमंत्री! देवेंद्र फडणवीसांचा टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.